एआय एक्स-रे तपासणीतून ठाणे जिल्ह्यात १४ हजारांहून अधिक नागरिकांची तपासणी
ठाणे, 03 जानेवारी (हिं.स.) भारत सरकार व महाराष्ट्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार ठाणे जिल्ह्यात राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलन कार्यक्रम (National Tuberculosis Elimination Programme – NTEP) संपूर्ण जिल्हाभर प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. हा कार्यक्र
Thane


ठाणे, 03 जानेवारी (हिं.स.) भारत सरकार व महाराष्ट्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार ठाणे जिल्ह्यात राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलन कार्यक्रम (National Tuberculosis Elimination Programme – NTEP) संपूर्ण जिल्हाभर प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. हा कार्यक्रम जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद ठाणे रणजित यादव यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीपणे अंमलात आणला जात असून, कार्यक्रमाची अंमलबजावणी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. कैलास पवार, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गंगाधर परगे व प्रभारी जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. दिनेश सुतार यांच्या अधिपत्याखाली करण्यात येत आहे. शासकीय आरोग्य संस्था, खासगी वैद्यकीय व्यावसायिक तसेच सामाजिक संस्थांच्या समन्वयातून हा कार्यक्रम प्रभावीपणे राबविला जात आहे.

या कार्यक्रमांतर्गत क्षयरोगाचा लवकर शोध, मोफत व दर्जेदार उपचार, नियमित औषधोपचार, रुग्णांना पोषण सहाय्य तसेच उपचार पूर्ण होईपर्यंत रुग्णांचा सतत पाठपुरावा यावर विशेष भर देण्यात येत आहे. रुग्णांचे उपचारात सातत्य राहावे यासाठी समुपदेशन व मार्गदर्शन करण्यात येत असून, उपचार प्रक्रियेवर काटेकोर देखरेख ठेवली जात आहे.

टीबीमुक्त भारत अभियान तसेच मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान अंतर्गत जिल्ह्यातील अतिजोखमीच्या लोकसंख्येची क्षयरोगासाठी तपासणी मोठ्या प्रमाणावर करण्यात येत आहे. यासाठी विशेषतः एक्स-रे तपासणीवर भर देण्यात येत असून, एआय (AI) आधारित Hand Held X-Ray मशीनच्या सहाय्याने गावोगावी तपासणी शिबिरे आयोजित करण्यात येत आहेत. या शिबिरांद्वारे अतिजोखमीच्या लोकांची तात्काळ तपासणी करून संभाव्य रुग्णांची ओळख पटविण्यात येत आहे.

महत्त्वाचे म्हणजे, एआय हँड हेल्ड एक्स-रे मशीनच्या माध्यमातून जानेवारी २०२५ ते डिसेंबर २०२५ या कालावधीत जिल्ह्यात एकूण १४,०८० व्यक्तींची तपासणी करण्यात आली असून, त्यापैकी २,४९३ व्यक्ती संशयित आढळून आल्या आहेत. या संशयितांपैकी १,९३७ व्यक्तींची थुंकी नमुना तपासणी करण्यात आली असून, त्यामधून २३ व्यक्ती क्षयरोग बाधित असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे जिल्ह्यात थुंकी नमुना तपासणीसह एआय आधारित हँड हेल्ड एक्स-रे मशीन अत्यंत उपयुक्त ठरत असून, संशयित रुग्णांची तात्काळ तपासणी करून त्यांना त्वरित उपचारांखाली आणणे शक्य होत आहे.

जानेवारी २०२५ ते डिसेंबर २०२५ या कालावधीत बदलापूर, भिवंडी, कल्याण, मुरबाड व शहापूर या तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर एक्स-रे तपासण्या करण्यात आल्या असून, भिवंडी व मुरबाड तालुक्यांमध्ये तुलनेने अधिक क्षयरोग रुग्ण आढळून आले आहेत. या आकडेवारीवरून जिल्ह्यातील अतिजोखमीच्या भागांमध्ये लक्ष केंद्रीत करून तपासणी व उपचार अधिक प्रभावीपणे राबविले जात असल्याचे स्पष्ट होते.

क्षयरोग बाधित रुग्णांना निक्षय पोषण योजना अंतर्गत दरमहा आर्थिक सहाय्य देण्यात येत असून, उपचारात सातत्य राखण्यासाठी रुग्णांना वेळोवेळी समुपदेशन व मार्गदर्शन करण्यात येत आहे. तसेच निकषानुसार अत्याधुनिक चाचण्या (CBNAAT / Truenat) तसेच औषधप्रतिरोधक क्षयरोगासाठी (MDR-TB) विशेष उपचार सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत.

जिल्ह्यातील नागरिकांनी दीर्घकाळ खोकला, ताप, वजन घटणे, रात्री घाम येणे अशी लक्षणे आढळल्यास त्वरित जवळच्या शासकीय आरोग्य संस्थेत तपासणी करून घ्यावी, असे आवाहन आरोग्य विभागामार्फत करण्यात आले आहे. क्षयरोग हा पूर्णपणे बरा होणारा आजार असून, वेळेवर निदान व नियमित आणि पूर्ण उपचार घेतल्यास रुग्ण पूर्णपणे बरा होतो, असेही आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर


 rajesh pande