
स्वाराती' मधील नवीन सीटी स्कॅन मशीन आठवडाभरात सुरू होणार
बीड, 03 जानेवारी (हिं.स.)। अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील सीटी स्कॅन मशिनचे इन्स्टॉलेशन अखेर पूर्ण झाले या मशिनची यशस्वी चाचणी घेण्यात आली. आमदार नमिता मुंदडा यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यातून राज्य शासनाने मंजूर केलेल्या १५ कोटी रुपयांच्या निधीतून ही अत्याधुनिक मशिन बसवण्यात आली आहे. येत्या पाच ते सहा दिवसांत सर्व तांत्रिक सोपस्कार पूर्ण करून ही मशिन रुग्णांच्या सेवेत दाखल होणार असल्याची माहिती मिळाली आहे. या सुविधेमुळे बीड जिल्ह्यासह लातूर, धाराशिव आणि परभणी जिल्ह्यातील हजारो रुग्णांना मोठा दिलासा मिळणार आहे.
स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालय हे मराठवाड्यातील एक अत्यंत जुने आणि महत्त्वाचे वैद्यकीय केंद्र असून येथे दररोज रुग्णांची
वर्दळ असते. या मशिनसाठी रुग्णालयात स्वतंत्र १२ हजार स्क्वेअर फूट जागेत विशेष बांधकाम करण्यात आले असून हा संपूर्ण विभाग वातानुकूलित करण्यात आला आहे. नवीन मशिन सुरू होण्यास तांत्रिक विलंब होत असताना आ. मुंदडा यांनी पुन्हा प्रशासकीय पातळीवर हालचाली केल्या, परिणामी हे काम युद्धपातळीवर पूर्ण झाले. केवळ अंबाजोगाईच नव्हे तर शेजारील तीन ते चार जिल्ह्यांतील रुग्णांना वेळेवर उपचार मिळण्यास मदत होईल.
केज विधानसभा मतदारसंघाच्या आमदार नमिता मुंदडा यांनी शासनाकडे या विषयाचा जोरदार पाठपुरावा केला होता. त्यांच्या प्रयत्नांना यश येऊन राज्य सरकारने व सीटी स्कॅन मशिन, इन्स्टॉलेशन, विद्युत काम आणि विशेष बांधकाम यासाठी सुमारे १५ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला. या निधीतून कॅनन कंपनीची २५६ स्लाईस क्षमता असलेली अत्यंत अत्याधुनिक मशिन रुग्णालयात दाखल झाली. या व मशिनमुळे अत्यंत सूक्ष्म तपशिलांसह आणि अधिक स्पष्टतेसह अहवाल मिळणार असून, यामुळे डॉक्टरांना आजाराचे अचूक निदान करणे सोपे होणार आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis