
अमरावती, 03 जानेवारी, (हिं.स.)
तिवसा तालुक्यातील संत्रा व मोसंबी उत्पादक शेतकऱ्यांना शासनाने जाहीर केलेली सन २०२५ ची नुकसानभरपाई तसेच जुलै ते सप्टेंबर २०२५ दरम्यान अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी ८,५०० रुपयांची मदत तातडीने देण्यात यावी, या मागणीसाठी तालुका युवक काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष जसबीर ठाकूर व अनकवाडी ग्रामपंचायत सरपंच सुरज धूमनखेडे यांच्या नेतृत्वात तिवसा तहसीलदार यांना निवेदन सादर करण्यात आले.
सन २०२५ मध्ये जून महिन्यापासून तालुक्यात सतत पावसाचा मारा सुरू होता. या अवकाळी व अतिवृष्टीमुळे संत्रा व मोसंबी बागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. फळगळ, मुळांची कुज आणि उत्पादन घट यामुळे शेतकऱ्यांचे अतोनात आर्थिक नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर शासनाने फळबाग उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी २२ हजार रुपयांची मदत जाहीर केली होती. मात्र जाहीर करून एक महिना उलटूनही बहुतांश शेतकऱ्यांच्या खात्यात एक रुपयाही जमा झालेला नाही. केवळ मोजक्याच शेतकऱ्यांना ही मदत मिळाली असून हजारो शेतकरी आजही अनुदानापासून वंचित आहेत.
त्याचप्रमाणे सोयाबीन पिकाचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी रब्बी हंगामाकरिता शासनाने हेक्टरी ८,५०० रुपयांची मदत जाहीर केली होती. मात्र तलाठ्यांच्या त्रुटीमुळे दोन महिने उलटूनही ही रक्कम शेतकऱ्यांना मिळालेली नाही. ऑक्टोबर-नोव्हेंबर २०२५ मध्ये संत्रा उत्पादक शेतकऱ्यांचे जे नुकसान झाले, त्याची भरपाईदेखील अद्याप देण्यात आलेली नाही, असा आरोप निवेदनात करण्यात आला.अमरावती जिल्ह्यातील काही तालुक्यांमध्ये अनुदान वाटप झाले असताना तिवसा तालुक्यातील शेतकऱ्यांवर अन्याय होत असल्याचे निदर्शनास आणून देण्यात आले. कपाशी व सोयाबीन पिकासाठी जाहीर केलेली रक्कम अद्याप एकाही शेतकऱ्याला मिळालेली नाही, ही गंभीर बाब असल्याचे युवक काँग्रेसने नमूद केले.यावेळी आशिष बायस्कर, नरेश साबळे, उपसरपंच प्रशांत प्रधान, पंडित बायस्कर, प्रवीण बाराई, गजानन वासनकर, विनोद मेश्राम, सुदर्शन चरपे, सुमित वऱ्हाडे, अनिकेत वऱ्हाडे, विकास तुर्काने, संदीप भुयार, मोतीराम चोपकर, विठ्ठल गहूकर, गणपत चोपकर, सुरेंद्र गहूकर, प्रशांत कांबळे, मनोज साबळे, डॉ अरविंद गहूकर, संजय चौधरी, हिम्मत महल्ले, गोपाल खराटे, धनराज खराटे, निलेश पाचघरे, नरेंद्र माहुरे, शोभा माहुरे, निलेश साबळे, रूपाली साबळे, मंगेश साबळे, गौरव चौधरी, विजय कुरळकर, हर्षल मेश्राम यांच्यासह पदाधिकारी व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी