
नांदेड, 03 जानेवारी (हिं.स.)।
नांदेड-वाघाळा
महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी मोठ्या राजकीय घडामोडी पाहायला मिळाल्या. २० प्रभागांतील ८१ जागांसाठी दाखल झालेल्या अजपैिकी ३७६ उमेदवारांनी माघार घेतली. त्यामुळे आता महापालिकेच्या आखाड्यात ४९१ उमेदवार आपले नशीब आजमावणार आहेत.
बंडोबांना थंड करण्यात नेत्यांना यश महायुती आणि महाविकास आघाडीतील प्रमुख पक्षांत बंडाळी रोखण्याचे मोठे आव्हान नेत्यांसमोर होते. भाजपमधील बंडखोर अॅड. दिलीप ठाकूर, महेंद्र पिंपळे आणि संजय पाटील यांची मनधरणी करण्यात पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांना यश आले असून त्यांनी आपले अर्ज मागे घेतले आहेत. काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना (शिंदे गट) आणि शिवसेना (उबाठा) या पक्षांतील बहुतांश बंडखोरांनी माघार घेतल्याने अधिकृत उमेदवारांनी सुटकेचा निः श्वास टाकला आहे. मात्र, तरीही काही ठिकाणी अपक्ष उमेदवार प्रस्थापितांची डोकेदुखी ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही.
स्वबळाच्या नाराऱ्यामुळे चौरंगी लढत यावेळच्या निवडणुकीचे वैशिष्ट्य म्हणजे काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी वगळता इतर सर्वच प्रमुख पक्ष स्वतंत्रपणे निवडणूक लढवत आहेत. महायुतीमधील भाजप, राष्ट्रवादी आणि शिव-सेनेने अनेक ठिकाणी तगडे उमेदवार दिल्याने मतांच्या विभाजनाचा फटका कोणाला बसणार, याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. १५ जानेवारी रोजी मतदान होणार असल्याने उमेदवारांच्या हाती प्रचारासाठी आता केवळ १२ दिवस उरले आहेत.
अशा प्रकारे एकूण ८६७ पात्र उमेदवारांपैकी ३७६ जणांनी माघार घेतल्याने आता ४९१ जणांमध्ये अंतिम लढत होणार आहे. आज होणाऱ्या चिन्ह वाटपानंतर शहरातील राजकीय वातावरण अधिकच तापणार असल्याचे चित्र आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis