
ठाणे, 03 जानेवारी (हिं.स.)।
अखेरच्या तासाभरात कुठे माशी शिंकली माहित नाही. मला एबी फॉर्म भरण्यासाठी शिवसेनेने बोलावले होते. परंतू प्रत्यक्षात दुसर्यालाच एबी फॉर्म दिला गेला. माझी फसवणूक केली, असा घाणाघाती आरोप प्रभाग क्र. 9 च्या संभाव्य उमेदवार सुरेखा पाटील यांनी पत्रकार परिषदेत केला.
कळव्यातील माझे सहकारी नगरसेवक शिवसेनेत प्रवेश घेताना शिवसेना मुख्य नेत्यांना म्हणाले होते, सुरेखा पाटील यांना उमेदवारी देणार असाल तरच आम्ही पक्षप्रवेश करतो, यावर मुख्य नेत्यांनी होकारार्थी उत्तर देवून शब्द दिला की, सुरेखा पाटील यांना उमेदवारी दिली जाईल त्यानंतरच पक्षप्रवेश झाला, अशी माहितीही सुरेखा पाटील यांनी दिली.
पुढे काय? या पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना सुरेखा पाटील म्हणाल्या, मी प्रभाग क्र. 9 (ब) मधून अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवत आहे. माझा जनतेवर पूर्ण विश्वास आहे मी ही निवडणूक अपक्ष म्हणून लढणार आणि जिंकूनसुद्धा येणार असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. दरम्यान, ज्या नगरसेवकांनी सुरेखाताईंना शब्द दिला होता. त्यांनी आपल्या पदरात उमेदवारी पाडून घेत मागच्या दाराने पळ काढला. अशी जहरी टीका सुरेखा पाटील यांनी पत्रकार परिषदेत केली. सुरेखा पाटील पुढे म्हणाल्या की, मी नेहमीच जनतेच्या बाजूने उभी राहिली आहे. 10 वर्षे नगरसेविका असताना माझ्या कडून विकासाची बरीच कामे झाली. 10-15 वर्ष माझ्याकडे पद नसतानाही मी जनतेची अखंड सेवा करत आली आहे.
यावेळी लोक भरभरून प्रेम देताहेत, असाही विश्वास सुरेखा पाटील यांनी व्यक्त केला. प्रभाग क्र. 9 (ब) मध्ये सुरेखा पाटील यांनी मोठे आव्हान उभे केल्याने शिवसेना वर्तुळात चिंतेचे वातावरण पसरले असल्याचे सुरेखा पाटील म्हणाल्या.
---------------
हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर