
नांदेड, 03 जानेवारी (हिं.स.)पोलीस अधीक्षक अविनाशकुमार म्हणाले की, गुन्हेगारीला आळा घालण्यासोबतच रोजगार मेळावा, मिशन निर्भया, नशामुक्त भारत यासारखे अभिनव उपक्रमही गत वर्षभरात राबविले. तसेच हरवलेल्या आणि अपहरण झालेल्या २१० मुली आणि ४५ मुलांचा शोध घेऊन त्यांना कुटुंबियांच्या ताब्यात देण्यात आले. सोबतच गतवर्षभरात बाळूमाफियांच्या विरोधात कारवाईतही महसूलपेक्षा पोलीसच आघाडीवर आहेत.
पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी विविध मोहिमा राबवून जिल्ह्यात कारवायांचा घडाका सुरू केला आहे. सन २०२४ मध्ये रेतीविरोधात १३५ गुन्हे दाखल करून १३ कोटी २७ लाख ५ हजार ९०० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला होता. यामध्ये सन २०२५ मध्ये १७४ टक्क्यांची वाढ झाली असून रेती विरोधात ३६९ गुन्हे दाखल करून ८० कोटी ६८ लाख २२ हजार ७४६ रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला. तर गुटखा विरोधात सन २०२५ मध्ये ५७ गुन्हे दाखल करून १ कोटी २१ लाख ९७ हजार ७०३ रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. अवैध दारू विक्री प्रकरणात ३१५० गुन्हे दाखल करून १ कोटी २० लाख ५४ हजार ८२८ रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला असून, जुगात्यांविरोधात ९४२ गुन्हे दाखल करून ८४ लाख ८१ हजार ८७५ रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला. प्रतिबंधक कारवायांमध्येही वाढ झाली असून सीआरपीसी ११० अन्वये २५८६, एमपीडीए अंतर्गत ४१, महाराष्ट्र पोलीस कायदा ५५ते ५७ अंतर्गत ४११ जणांवर प्रतिबंधात्मक
कारवाया करण्यात आल्या आहेत. मकोका अंतर्गत होणारी कारवाई महत्त्वाची समजली जाते. सन २०२४ मध्ये एकच कारवाई करण्यात आली होती. २०२५ मध्ये यात वाढ झाली असून, ५ जणांवर मकोका अंतर्गत कारवाया करण्यात आल्या आहेत. दरोडा प्रकरणात १९ गुन्हे दाखल असून ७ कोटी ५३ लाखांचा मुद्देमाल जप्त केला. घरफोडी प्रकरणात २२८ गुन्हे दाखल करून ४२ लाख ६ हजार ५०७ रुपयांचा, जबरी चोरीत ७३ गुन्हे दाखल करून ६१ लाख २१ हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तसेच ५०० जणांविरुध्द हद्दपारीचा प्रस्ताव दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची जनजागृती करण्यासाठी मिशन निर्भया अभियान राबविले. त्यात सायबर क्राईम, वाहतूक सुरक्षा, महिला व बालसुरक्षा याबाबत विद्याथ्यांना माहिती देण्यात आली. रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून तब्बल साडेतीन हजार बेरोजगारांच्या हाताला कामही देण्यात आले.
जिल्ह्यामध्ये खंडणीविरोधी पथकाची स्थापना करण्यात येऊन संघटितरित्या गुन्हेगारी करणाऱ्या, दहशतीच्या बळावर खंडणी उकळण्याचा प्रयत्न करणाऱ्या गुन्हेगाराविरुध्द कठोर कारवाई करत बऱ्याच कालावधीपासून अटक नसलेले, फरार असलेले रिंदा टोळीतील ६ आरोपींना जिल्ह्यातून तसेच परराज्यातून कसोशीने शोध घेऊन अटक करण्यात आली. सद्यःस्थितीत हे सर्व आरोपी कारागृहात आहेत.
महिला साहाय्य कक्षाकडे वर्षभरात तब्बल १ हजार ८५ तक्रारी आल्या होत्या. आलेला दुरावा मिटविण्यासाठी पोलिसांनी अनेकांचे समुपदेशनही केले. त्यापैकी १ हजार ७ तक्रारींचे निवारण करण्यात आले आहे. पती-पत्नीमध्ये आलेला दुरावा मिटविण्यासाठी पोलिसांनी अनेकांचे समुपदेशनही केले. रामतीर्थ, तामसा, सिंदखेड, भाग्यनगर व नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यांतर्गत महिला अत्याचाराच्या संदभनि गुन्ह्यात पोलिसांनी २४ तासांच्या आत न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. एकूणच जिल्हा पोलीस दलाची सन २०२४ मध्ये सर्वच क्षेत्रांमध्ये कामगिरी सरस राहिली आहे. तसेच आगामी काळातही जिल्हा गुन्हेगारीमुक्त करण्यावर जिल्हा पोलीस अधीक्षक अबिनाशकुमार यांचा भर असून तसा संकल्प त्यांनी केला आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis