बीवायडीने टेस्लाला मागे टाकत मिळवलं ईव्ही बाजारात अव्वल स्थान
मुंबई, 04 जानेवारी (हिं.स.)। 2025 हे वर्ष जागतिक इलेक्ट्रिक वाहन (ईव्ही) उद्योगासाठी मोठा टर्निंग पॉइंट ठरलं आहे. अनेक वर्षे ईव्ही क्षेत्रात आघाडीवर असलेली अमेरिकन कंपनी टेस्ला आता चीनच्या बीवायडी कंपनीच्या मागे पडली आहे. 2025 मध्ये बीवायडीने तब्ब
BYD Overtakes Tesla


मुंबई, 04 जानेवारी (हिं.स.)। 2025 हे वर्ष जागतिक इलेक्ट्रिक वाहन (ईव्ही) उद्योगासाठी मोठा टर्निंग पॉइंट ठरलं आहे. अनेक वर्षे ईव्ही क्षेत्रात आघाडीवर असलेली अमेरिकन कंपनी टेस्ला आता चीनच्या बीवायडी कंपनीच्या मागे पडली आहे. 2025 मध्ये बीवायडीने तब्बल 2.26 दशलक्ष इलेक्ट्रिक वाहनांची विक्री करत जगातील सर्वात मोठी ईव्ही निर्माता कंपनी बनण्याचा मान पटकावला आहे. याच कालावधीत टेस्लाची विक्री घसरून 1.64 दशलक्षांवर आली असून सलग दुसऱ्या वर्षी कंपनीला विक्रीत घट नोंदवावी लागली आहे.

टेस्ला इंकनं 2025 च्या चौथ्या तिमाहीत 4,18,227 वाहनांची डिलिव्हरी केली, जी मागील वर्षाच्या तुलनेत सुमारे 16 टक्क्यांनी कमी आहे. पूर्ण वर्षाचा विचार करता टेस्लाची एकूण विक्री 8.6 टक्क्यांनी घटून 1.64 दशलक्ष वाहनांवर आली. ही सलग दुसरी वेळ आहे की टेस्लाच्या विक्रीत घट झाली आहे. अमेरिकेत ट्रम्प प्रशासनानं ईव्ही खरेदीवरील फेडरल टॅक्स क्रेडिट बंद केल्याचा थेट फटका टेस्लाला बसला. त्यासोबतच इंधन कार्यक्षमतेचे नियम शिथिल करण्यात आल्याने ग्राहकांचा ईव्हीकडे असलेला ओढा काही प्रमाणात कमी झाला. युरोप आणि चीनमध्ये वाढलेली स्थानिक व आंतरराष्ट्रीय स्पर्धाही टेस्लासाठी आव्हान ठरली आहे. एलॉन मस्क यांनी कंपनीचं लक्ष रोबोटॅक्सी आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्सकडे वळवलं असलं, तरी मुख्य वाहन व्यवसाय अपेक्षेप्रमाणे कामगिरी करू शकलेला नाही.

याच्या उलट, बीवायडीसाठी 2025 हे वर्ष अत्यंत यशस्वी ठरले. कंपनीने बॅटरी इलेक्ट्रिक वाहनांच्या विक्रीत तब्बल 28 टक्क्यांची वाढ नोंदवली असून 2.26 दशलक्ष ईव्ही विक्री केली आहे. याशिवाय, प्लग-इन हायब्रिडचा समावेश असलेल्या एकूण नवीन ऊर्जा वाहनांच्या (NEV) विक्रीत बीवायडीने 4.55 दशलक्षांहून अधिक वाहनांची विक्री केली आहे. युरोप, लॅटिन अमेरिका आणि आग्नेय आशिया या बाजारपेठांमध्ये बीवायडीने वेगाने विस्तार करत आपली पकड मजबूत केली आहे. मागील वर्षी बीवायडीने टेस्लाला अत्यंत कमी फरकाने मागं टाकलं होतं, मात्र 2025 मध्ये कंपनी स्पष्टपणे पहिल्या क्रमांकावर पोहोचली आहे. वाहन विक्रीत अडचणी असतानाही टेस्लानं ऊर्जा साठवण (एनर्जी स्टोरेज) क्षेत्रात मात्र दमदार कामगिरी केली आहे. 2025 च्या चौथ्या तिमाहीत टेस्लानं 14.2 गिगावॅट तास ऊर्जा साठवण उत्पादनं पुरवली, तर पूर्ण वर्षासाठी ही संख्या 46.7 गिगावॅट तासांपर्यंत पोहोचली, जी मागील वर्षाच्या तुलनेत लक्षणीय वाढ आहे.

भविष्यातील दृष्टीने पाहता, दोन वर्षांपूर्वी टेस्ला दरवर्षी 3 दशलक्ष वाहनांची विक्री करण्याचं लक्ष्य गाठेल अशी अपेक्षा होती, मात्र ती आता 1.8 दशलक्षांपर्यंत खाली आली आहे. एलॉन मस्क सायबरकॅब आणि रोबोटॅक्सी प्रकल्पांवर मोठा भर देत असले, तरी नियामक अडथळे आणि वाढती स्पर्धा ही मोठी आव्हाने आहेत. दुसरीकडे, बीवायडी स्वस्त दरात विविध मॉडेल्स सादर करून जागतिक बाजारात आपली स्थिती अधिक भक्कम करत आहे. 2025 मध्ये टेस्लाचा शेअर 11 टक्क्यांनी वाढला असला, तरी ईव्ही बाजारातील त्याचे वर्चस्व मात्र कमकुवत झाले आहे. 2026 मध्ये स्वयंचलित वाहन तंत्रज्ञान यशस्वी ठरल्यास टेस्ला पुनरागमन करू शकते, पण सध्या तरी जागतिक ईव्ही बाजारावर बीवायडीचीच बादशाही पाहायला मिळत आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande