किआ इंडियाने नवी किआ सेल्टॉसच्या जाहीर केलेल्या किमती
मुंबई, 04 जानेवारी (हिं.स.)। किआ इंडियाने भारतीय बाजारात दुसऱ्या जनरेशनची नवी किआ सेल्टॉस अधिकृतपणे लाँच केली आहे. या लोकप्रिय कॉम्पॅक्ट एसयूव्हीची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत 10.99 लाख रुपये असून टॉप व्हेरिएंटची किंमत 19.99 लाख रुपयांपर्यंत जाते.
New Kia Seltos


मुंबई, 04 जानेवारी (हिं.स.)। किआ इंडियाने भारतीय बाजारात दुसऱ्या जनरेशनची नवी किआ सेल्टॉस अधिकृतपणे लाँच केली आहे. या लोकप्रिय कॉम्पॅक्ट एसयूव्हीची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत 10.99 लाख रुपये असून टॉप व्हेरिएंटची किंमत 19.99 लाख रुपयांपर्यंत जाते. यापूर्वी या गाडीचे अनावरण करण्यात आले होते आणि 11 डिसेंबरपासून 25 हजार रुपयांच्या टोकन रकमेवर बुकिंग सुरू झाले होते. कंपनीच्या माहितीनुसार, नवी सेल्टॉसची डिलिव्हरी जानेवारी महिन्याच्या मध्यापासून सुरू होणार आहे.

नव्या किआ सेल्टॉसच्या विविध इंजिन आणि ट्रान्समिशन पर्यायांनुसार किंमती वेगवेगळ्या व्हेरिएंटमध्ये उपलब्ध आहेत. 1.5 लिटर नॅचरल अ‍ॅस्पिरेटेड पेट्रोल मॅन्युअल (MT) इंजिनची सुरुवात HTE व्हेरिएंटमध्ये 10.99 लाख रुपयांपासून होते, तर HTX (A) मध्ये ही किंमत 16.69 लाख रुपयांपर्यंत जाते; मात्र GTX आणि X-Line मध्ये हा पर्याय उपलब्ध नाही. याच इंजिनचा CVT ऑटोमॅटिक पर्याय HTE (O) पासून 13.39 लाखांपासून सुरू होऊन GTX (A) / X-Line मध्ये 19.49 लाख रुपयांपर्यंत जातो. 1.5 लिटर टर्बो-पेट्रोल iMT हा पर्याय HTE (O) पासून 12.89 लाखांपासून HTK (O) मध्ये 14.99 लाखांपर्यंत उपलब्ध आहे, तर टर्बो-पेट्रोल DCT ऑटोमॅटिक HTK (O) मध्ये 16.29 लाखांपासून सुरू होऊन GTX (A) / X-Line मध्ये 19.99 लाख रुपयांपर्यंत मिळतो. डिझेल सेगमेंटमध्ये 1.5 लिटर डिझेल मॅन्युअलची किंमत 12.59 लाखांपासून 18.29 लाखांपर्यंत आहे, तर डिझेल ऑटोमॅटिक (AT) HTE (O) मध्ये 14.99 लाखांपासून सुरू होऊन टॉप GTX (A) / X-Line मध्ये 19.99 लाख रुपयांपर्यंत जाते.

नवी किआ सेल्टॉस आता अधिक मोठी, प्रीमियम आणि फीचर-लोडेड बनली आहे. ही एसयूव्ही एचटीई, एचटीके, एचटीएक्स, जीटीएक्स आणि एक्स-लाइन अशा पाच मुख्य ट्रिम्समध्ये उपलब्ध आहे. बेस व्हेरिएंट एचटीई असून जीटीएक्स आणि एक्स-लाइन हे टॉप एंड व्हेरिएंट्स आहेत. पेट्रोल आणि डिझेल इंजिनसह मॅन्युअल व ऑटोमॅटिक ट्रान्समिशनचे विविध पर्याय देण्यात आले आहेत. जुन्या मॉडेलच्या तुलनेत किंमत थोडी वाढलेली असली, तरी नव्या डिझाइन, अपडेटेड टेक्नॉलॉजी आणि सुरक्षिततेच्या फीचर्समुळे ही वाढ योग्य असल्याचं मानलं जात आहे.

डिझाइनच्या बाबतीत नवी सेल्टॉस किआच्या ग्लोबल स्टाइलिंगवर आधारित आहे. समोर टायगर नोज ग्रिल, व्हर्टिकल एलईडी हेडलॅम्प्स आणि अधिक उंचावलेला प्रोफाइल देण्यात आला आहे. 18 इंचांचे नवे अलॉय व्हील्स, कनेक्टेड टेललॅम्प्स, नव्या डिझाइनचे बंपर्स आणि गनमेटल फिनिशमधील स्किड प्लेट्स यामुळे गाडी अधिक आकर्षक आणि स्मार्ट दिसते.

केथ्री प्लॅटफॉर्मवर आधारित असलेली नवी सेल्टॉस आता या सीरिजमधील सर्वात मोठी ठरते. तिची लांबी 4,460 मिमी, रुंदी 1,830 मिमी, उंची सुमारे 1,630 मिमी असून व्हीलबेस 2,690 मिमी आहे, जो आधीपेक्षा 80 मिमीने जास्त आहे. त्यामुळे केबिनमध्ये अधिक प्रशस्त जागा मिळते.

इंटिरियरमध्ये पूर्णपणे नवे डॅशबोर्ड लेआउट, ड्युअल-टोन हायलाइट्स आणि लेदरेट अपहोल्स्ट्री देण्यात आली आहे. फ्लॅट-बॉटम स्टीयरिंग व्हील आणि तब्बल 30 इंचाच्या ड्युअल कर्व्ड स्क्रीन्स हे या गाडीचे मोठे आकर्षण ठरतात. फीचर्समध्ये ड्युअल-झोन क्लायमेट कंट्रोल, वेंटिलेटेड सीट्स, वायरलेस चार्जर, वायरलेस अँड्रॉइड ऑटो व ॲपल कारप्ले, हेड्स-अप डिस्प्ले, पॉवर्ड ड्रायव्हर सीट, बोस 8-स्पीकर ऑडिओ सिस्टीम, अ‍ॅम्बियंट लाइटिंग आणि रिअर रिक्लायनिंग सीट्स यांचा समावेश आहे. सुरक्षिततेच्या दृष्टीने नवी किआ सेल्टॉस अधिक मजबूत करण्यात आली आहे. सर्व व्हेरिएंट्समध्ये 6 एअरबॅग्स स्टँडर्ड देण्यात आल्या आहेत.

याशिवाय ईएसपी, हिल-स्टार्ट असिस्ट, ऑल-व्हील डिस्क ब्रेक्स, 360-डिग्री कॅमेरा आणि लेव्हल 2 एडीएएस फीचर्स देण्यात आले आहेत. लेन कीप असिस्ट, अ‍ॅडॅप्टिव्ह क्रूझ कंट्रोल तसेच स्नो, मड आणि सँड ड्राइव्ह मोड्समुळे गाडी अधिक सुरक्षित आणि स्मार्ट बनते. पॉवरट्रेनमध्ये तीन इंजिन पर्याय उपलब्ध आहेत. 1.5 लिटर नॅचरल अस्पिरेटेड पेट्रोल इंजिन 115 एचपी आणि 144 एनएम टॉर्क निर्माण करतं. 1.5 लिटर टर्बो-पेट्रोल इंजिन 160 एचपी आणि 253 एनएम टॉर्कसह येतं, तर 1.5 लिटर डिझेल इंजिन 116 एचपी आणि 250 एनएम टॉर्क जनरेट करतं. ट्रान्समिशनसाठी मॅन्युअल, आयव्हीटी, आयएमटी आणि डीसीटी असे पर्याय देण्यात आले आहेत.

भारतीय बाजारात नवी किआ सेल्टॉसला ह्युंदाई क्रेटा, मारुती सुझुकी ग्रँड विटारा, टोयोटा अर्बन क्रूझर हायरीडर, होंडा एलिव्हेट आणि इतर कॉम्पॅक्ट एसयूव्हींशी थेट स्पर्धा करावी लागणार आहे. अधिक प्रीमियम लुक, अत्याधुनिक फीचर्स आणि सुधारित सुरक्षिततेमुळे नवी किआ सेल्टॉस कॉम्पॅक्ट एसयूव्ही सेगमेंटमध्ये मजबूत दावेदार ठरेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande