
मुंबई, 04 जानेवारी (हिं.स.)। ओप्पो कंपनीने आपली नवी रेनो 15 मालिका भारतीय बाजारात लाँच करण्याची अधिकृत घोषणा केली आहे. ही मालिका 8 जानेवारी 2026 रोजी भारतात दाखल होणार असून, यामध्ये ओप्पो रेनो 15, रेनो 15 प्रो आणि रेनो 15 प्रो मिनी अशी तीन मॉडेल्स असतील. आकर्षक डिझाइन आणि दमदार कॅमेरा परफॉर्मन्ससाठी ओळखल्या जाणाऱ्या रेनो मालिकेत यावेळी कॅमेरा तंत्रज्ञानावर विशेष भर देण्यात आला आहे. ट्रॅव्हल फोटोग्राफी, पोर्ट्रेट्स आणि एआय-आधारित इमेजिंगमध्ये ही मालिका नवे मानक प्रस्थापित करेल, असा कंपनीचा दावा आहे.
रेनो 15 प्रो 5G आणि रेनो 15 प्रो मिनी 5G या दोन्ही मॉडेल्समध्ये 200 मेगापिक्सेलचा मुख्य रियर कॅमेरा देण्यात आला आहे. यासोबत 50 मेगापिक्सेलचा 3.5एक्स टेलिफोटो पोर्ट्रेट कॅमेरा आणि 100 डिग्री फील्ड ऑफ व्ह्यूसह 50 मेगापिक्सेलचा अल्ट्रा-वाइड कॅमेरा मिळणार आहे. टेलिफोटो कॅमेरा 3.5एक्स ऑप्टिकल झूम सपोर्ट करतो. नवी प्युअरटोन टेक्नॉलॉजी फोटोमध्ये विषय आणि पार्श्वभूमी यांच्यातील रंग आणि प्रकाश संतुलित ठेवते, त्यामुळे अधिक नैसर्गिक आणि प्रोफेशनल आउटपुट मिळतो. ग्रुप फोटो प्रोसेसिंग आणि टोन-बॅलेंसिंग तंत्रज्ञानामुळे वेगवेगळ्या प्रकाश परिस्थितीतही फोटोची गुणवत्ता टिकून राहते.
AI Portrait Glow सीरिजमध्ये AI Editor 3.0 हे नवीन फीचर देण्यात आले असून, त्यामध्ये AI Portrait Glow आणि मोशन फोटो एडिटिंग टूल्सचा समावेश आहे. मुख्य कॅमेरावर ड्युअल कन्व्हर्जन गेन व्हिडिओ सपोर्टमुळे कमी प्रकाशातही उत्तम डायनॅमिक रेंज मिळेल. प्रो मॉडेल्समध्ये फ्रंट, मुख्य, अल्ट्रा-वाइड आणि टेलिफोटो अशा सर्व कॅमेऱ्यांवर 4K HDR व्हिडिओ रेकॉर्डिंग 60 एफपीएसपर्यंत सपोर्ट असेल. याशिवाय इलेक्ट्रॉनिक आणि ऑप्टिकल इमेज स्टेबिलायझेशन, ड्युअल-व्ह्यू व्हिडिओ आणि व्हिडिओ रेकॉर्डिंगदरम्यान फोटो कॅप्चर करण्याची सुविधाही देण्यात आली आहे.
स्टँडर्ड ओप्पो रेनो 15 5G मध्ये 50 मेगापिक्सेलचा मुख्य कॅमेरा, 50 मेगापिक्सेलचा 3.5एक्स टेलिफोटो आणि 8 मेगापिक्सेलचा अल्ट्रा-वाइड कॅमेरा असेल. सेल्फीसाठी 50 मेगापिक्सेलचा अल्ट्रा-वाइड फ्रंट कॅमेरा देण्यात आला असून, या मॉडेलमध्येही विविध एआय कॅमेरा फीचर्स मिळणार आहेत.
डिझाइनच्या बाबतीत रेनो 15 सीरिजमध्ये एरोस्पेस-ग्रेड अॅल्युमिनियम फ्रेम आणि HoloFusion टेक्नॉलॉजी देण्यात आली आहे. हे फोन IP66, IP68 आणि IP69 रेटिंगसह धूळ व पाण्यापासून सुरक्षित असतील. रेनो 15 प्रो मिनीमध्ये 6.32 इंच AMOLED डिस्प्ले असून स्क्रीन-टू-बॉडी रेशियो 93.35 टक्के आहे. रेनो 15 प्रोमध्ये 6.78 इंच तर स्टँडर्ड रेनो 15 मध्ये 6.59 इंच AMOLED डिस्प्ले मिळेल. सर्व मॉडेल्समध्ये फुल-HD+ रिझोल्यूशन देण्यात येणार असून, प्रो व्हेरियंट्समध्ये अधिक पीक ब्राइटनेस मिळेल.
लीक्सनुसार, रेनो 15 प्रो मिनीमध्ये मीडियाटेक डायमेन्सिटी 8450 चिपसेट, 6,200 एमएएच क्षमतेची बॅटरी आणि फास्ट चार्जिंग सपोर्ट अपेक्षित आहे. या फोनचं वजन सुमारे 187 ग्रॅम असण्याची शक्यता आहे. रेनो 15 सीरिज फ्लिपकार्ट, अॅमेझॉन आणि ओप्पो इंडिया ऑनलाइन स्टोअरवर विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule