स्वस्त मॅकबुक 2026 मध्ये आणण्याची ॲपलची तयारी
मुंबई, 05 जानेवारी (हिं.स.)। ॲपल आपल्या लॅपटॉप धोरणात मोठा बदल करण्याच्या तयारीत असून 2026 मध्ये एक नवीन स्वस्त मॅकबुक बाजारात आणण्याची शक्यता आहे. या नव्या मॅकबुकमुळे मध्यम श्रेणीतील ग्राहक, विद्यार्थी आणि पहिल्यांदा लॅपटॉप खरेदी करणाऱ्यांना आकर्ष
cheap MacBook


मुंबई, 05 जानेवारी (हिं.स.)। ॲपल आपल्या लॅपटॉप धोरणात मोठा बदल करण्याच्या तयारीत असून 2026 मध्ये एक नवीन स्वस्त मॅकबुक बाजारात आणण्याची शक्यता आहे. या नव्या मॅकबुकमुळे मध्यम श्रेणीतील ग्राहक, विद्यार्थी आणि पहिल्यांदा लॅपटॉप खरेदी करणाऱ्यांना आकर्षित करण्याचा कंपनीचा प्रयत्न असणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, या मॅकबुकमध्ये सुमारे 12.9 इंचाचा डिस्प्ले देण्यात येणार असून तो प्रवेशस्तरीय बाजारपेठेसाठी डिझाइन करण्यात येईल. हा लॅपटॉप सध्याच्या मॅकबुक एअरपेक्षा खालच्या श्रेणीत असेल, मात्र ॲपलच्या दर्जा आणि इकोसिस्टमचा अनुभव देणारा असेल.

या स्वस्त मॅकबुकमध्ये आयफोन 16 प्रो मालिकेतील ए18 प्रो चिपचा वापर केला जाणार आहे. या चिपमध्ये 6-कोर सीपीयू, 6-कोर जीपीयू आणि 16-कोर न्यूरल इंजिन असून परफॉर्मन्सच्या बाबतीत ती ॲपलच्या मूळ M1 चिपच्या जवळपास असल्याचं मानलं जात आहे. वेब ब्राउझिंग, ऑफिस कामकाज, ऑनलाइन क्लासेस तसेच हलक्या क्रिएटिव्ह वापरासाठी ही चिप पुरेशी ताकदवान ठरेल. M सिरीज चिप्सच्या तुलनेत उत्पादन खर्च कमी ठेवण्यासाठी ए18 प्रो चिपची निवड केल्याचंही सांगितलं जात आहे.

किंमतीच्या बाबतीत हा मॅकबुक अमेरिकेत $599 ते $899 दरम्यान उपलब्ध होण्याचा अंदाज आहे. सध्या मॅकबुक एअरची अधिकृत किंमत $999 असून सवलतीनंतर ती $749 पर्यंत येते. त्यामुळे हा नवा मॅकबुक अधिक किफायतशीर पर्याय ठरेल. मात्र किंमत कमी ठेवण्यासाठी काही तडजोडीही अपेक्षित आहेत. बेस मॉडेलमध्ये फक्त 8 जीबी रॅम देण्यात येईल, तर सध्याच्या मॅकबुक एअर आणि प्रो मॉडेल्समध्ये किमान 16 जीबी रॅम उपलब्ध आहे. तसेच ए18 प्रो चिप थंडरबोल्ट सपोर्ट देत नसल्यामुळे या लॅपटॉपमध्ये केवळ स्टँडर्ड यूएसबी-सी पोर्ट्स असतील, ज्यामुळे डेटा ट्रान्सफर स्पीड आणि एक्स्टर्नल डिस्प्ले सपोर्ट मर्यादित राहू शकतो.

या स्वस्त मॅकबुकच्या योजनांना ॲपल सप्लाय चेन ॲनालिस्ट मिंग-ची कुओ यांनीही दुजोरा दिला आहे. त्यांच्या मते, या लॅपटॉपचा डिस्प्ले सुमारे 13 इंचांचा असेल आणि यात ए18 प्रो चिप वापरण्यात येईल. याशिवाय सिल्व्हर, ब्ल्यू, पिंक आणि येलो असे आकर्षक रंगीत पर्यायही उपलब्ध असतील. हा नवा मॅकबुक ॲपलला बजेट सेगमेंटमध्ये अधिक मजबूत बनवेल आणि क्रोमबुकसारख्या स्पर्धकांना थेट टक्कर देईल. 2026 मध्ये या लॅपटॉपचं अधिकृत लॉंच होण्याची शक्यता असून त्यामुळे ॲपलची मॅकबुक लाइनअप अधिक व्यापक आणि विविध ग्राहकांसाठी सुलभ होईल.

---------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande