
रत्नागिरी, 5 जानेवारी, (हिं. स.) : कलाकारांसाठी तरी कलाकारांनी एकत्र येणे गरजेचे आहे, असे मत कोकणरत्न संतोषजी शिर्सेकर बुवा यांनी व्यक्त केले.
रत्नागिरी जिल्ह्यातील सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, आध्यात्मिक आरोग्य क्षेत्रातील अग्रेसर आभार सांस्कृतिक कला क्रीडा मंडळ आणि रत्नागिरी जिल्हा प्रासादिक भजन मंडळांची वार्षिक सभा देवर्षी नगर सभागृहात अध्यक्ष साईनाथ नागवेकर यांच्या अध्यक्षतेखाली झाली. त्यावेळी श्री. शिर्सेकर बोलत होते. यावर्षी मंडळाने महिलांना नमन कलेच्या माध्यमातून व्यासपीठ निर्माण करून दिले, ही खूप मोठी गोष्ट आहे. त्याबद्दल सर्वांनीच महिलांचे कौतुक केले. पण हे शिवधनुष्य ज्या महिलांनी उचलले आहे त्या सर्व महिलांना सलाम करावाच लागेल. आज ही संस्था सर्व कलाकारांना व्यासपीठ द्यायला तयार आहेय आर्थिक दृष्ट्याही मदतही करत आहे. परतु कलाकारांना न्याय्य हक्क मिळवण्यासाठी व हक्काच्या या व्यासपीठावर काम करण्यासाठी कलाकारांनीच कलाकारांसाठी एकत्र येणे ही काळाची गरज आहे हे कलाकारांनीच जाणले पाहिजे. त्यासाठी कलाकारांनी एकत्र यायला पाहिजे. संस्था उत्तम प्रकारे काम करत आहे. संस्थेचे ध्येयही मोठे आहे, असेही श्री. शिर्सेकर म्हणाले.
यावेळी शरद गोळपकर, संजय सुर्वे बुवा, महिला मंडळ अध्यक्षा सौ. प्रेरणाताई विलणकर, सचिव सौ. समीक्षा वालम आदी मान्यवर उपस्थित होते. सभेत इतिवृत्त वाचन, वार्षिक जमा खर्च, लेखापरीक्षण अहवाल, पुढिल कार्यक्रम व खर्चाचे नियोजन करण्यासाठी परवानगी घेण्यात आली.
यावेळी प्रवीण सावंतदेसाई, संजय सुर्वेबुवा यांनी मनोगत व्यक्त केले. अध्यक्षीय भाषणात श्री. नागवेकर म्हणाले की, आपण एकत्र येऊन काम केले, तर कलाकारांना आणखी ऊर्जा येईल.
यावेळी ज्येष्ठ भजनी कलाकार मिलिंद आरेकरबुवा, संजय मेस्री बुवा, प्रसाद राणे, सागर मायंगडे, दादा वाडेकर, राकेश बेर्डे, श्रीनिवास शिरगावकर, सौ. मानसी साळवी, सौ. शीतल सकपाळ आदी मान्यवर उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी