
छत्रपती संभाजीनगर, 08 जानेवारी (हिं.स.) छत्रपती संभाजी नगर जिल्ह्याच्या परिसरात कडाक्याच्या थंडीमुळे हवामानात मोठा बदल झाला आहे याचा फटका रब्बी पिकांना मोठ्या प्रमाणात बसतो आहे यामुळे शेतकरी अत्यंत चिंतेत सापडला असल्याचे दिसते.गेल्या आठवड्यात कडाक्याच्या थंडीने शेतकऱ्यांची परीक्षा घेतली. आता दोन-तीन दिवसांपासून ढगाळ हवामानाने संकट वाढवले आहे. सिल्लोड तालुक्यातील गहू आणि हरभरा उत्पादक शेतकरी अडचणीत आले आहेत.
गेल्या ८ ते १५ दिवसांपासून थंडीचा जोर अधिक होता. या अतिथंडीचा परिणाम गहू आणि हरभरा पिकांवर झाला आहे. अलिकडच्या काळात शेतकरी मका सोडून हरभऱ्याकडे वळले. कमी खर्चात जास्त उत्पन्न मिळेल या आशेने मोठ्या प्रमाणात हरभऱ्याची लागवड झाली. मात्र, हवामान बदलामुळे हरभऱ्यावर करपा रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. गहू पिक पिवळे पडली आहे. ढगाळ वातावरण आणि धुक्यामुळे गहू पिवळा पडत असल्याने शेतकरी चिंतेत आहेत.
डिसेंबरपासून रब्बी पिकांची चांगली वाढ झाली होती. त्यामुळे खरीप हंगामातील नुकसान भरून निघेल अशी अपेक्षा होती. पण अलीकडील हवामान बदलामुळे ही आशा धोक्यात आली आहे. धुक्यामुळे रोग वाढत आहेत. त्यामुळे आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे. शेतकरी म्हणतात, हवामान सतत बदलत आहे. त्यामुळे रोग आणि किडींचा प्रादुर्भाव वाढतोय. त्याचा थेट परिणाम उत्पन्नावर होत आहे.
उत्पादन धोक्यात आले आहे. रोग आणि किडीमुळे कीटकनाशक व बुरशीनाशक फवारण्या वाढल्या आहेत. हवामानामुळे गहू, हरभरा, मका, कांदा, मिरची, ज्वारी आणि पालेभाज्यांवर रोगराईचा धोका वाढला आहे. काही भागांत गहू पेरणीस तयार आहे.
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis