
सोलापूर, 05 जानेवारी (हिं.स.)।
: महानगरपालिका निवडणुकीतील भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांनी प्रत्येक मतदारांपर्यंत भाजपाची ध्येय धोरणे संपर्काच्या माध्यमातून पोहोचवावीत, असे आवाहन पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी केले.
महापालिका निवडणुकीसंदर्भात पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी नुकतीच उमेदवारांच्या बैठक घेऊन चर्चा केली. याप्रसंगी आमदार देवेंद्र कोठे, भाजपाचे पश्चिम महाराष्ट्र संघटनमंत्री मकरंद देशपांडे, शहराध्यक्षा रोहिणी तडवळकर, माजी आमदार दिलीप माने, भाजपाचे जिल्हा सरचिटणीस मनीष देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती.
पालकमंत्री जयकुमार गोरे म्हणाले, भारतीय जनता पार्टी पूर्ण ताकतीने सोलापूर महानगरपालिकेची निवडणूक लढवत आहे. अशावेळी भाजपाच्या उमेदवारांनी प्रभागांमध्ये अधिकाधिक व्यक्तींशी संपर्क साधून भारतीय जनता पार्टीला विजयी करण्याचे आवाहन करावे. भाजपाने राज्यात आणि केंद्रात केलेल्या विकासकामांची तसेच सोलापूर शहरात झालेल्या धुळमुक्त सोलापूर, पाणी पुरवठ्यासाठी ८९२ कोटी रुपये, विमानसेवा, आयटी पार्क, लाडकी बहीण योजना अशा विकासकामांची माहिती नागरिकांना भेटून द्यावी. केंद्रात, राज्यात सत्ता असल्याने सोलापूरला भरघोस निधी देता येईल. राज्य तसेच केंद्राच्या योजना नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी स्वतंत्र गट तयार करावेत. सोशल मीडियावर अधिकाधिक सक्रिय रहावे. मतदार यादीतील प्रत्येक मतदारापर्यंत उमेदवार आणि भाजपाच्या कार्यकर्त्यांनी पोहचावे.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड