
सोलापूर, 05 जानेवारी (हिं.स.)। सोलापूर ते हैद्राबाद या राष्ट्रीय महामार्ग वरील मोठे गाव असणाऱ्या बोरामणी (ता. दक्षिण सोलापूर) येथे गतिरोधक व दिशादर्शक फलक नसल्यामुळे सातत्याने अपघात होत असून नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर बोरामणी येथे तात्काळ गतिरोधक व दिशादर्शक फलक बसवावेत, अन्यथा मोठे जनआंदोलन करण्यात येईल असा इशारा शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख तथा पंचायत समितीचे माजी सदस्य धनेश आचलारे यांनी राष्ट्रीय महामार्ग विभागाचे उपमहाप्रबंधक (तांत्रिक) व प्रकल्प संचालक स्वप्निल कासार यांना निवेदनाद्वारे दिला आहे. यावेळी धनेश आचलारे म्हणाले, राष्ट्रीय महामार्गामुळे गावाचे दोन भाग झाले आहेत. नागरिकांना दररोज जीव धोक्यात घालून महामार्ग ओलांडावा लागत आहे. महामार्गावर वाहनांची मोठी वर्दळ असल्याने अपघातांचे प्रमाण वाढत चालले आहे. आजूबाजूच्या अनेक गावांमध्ये राष्ट्रीय महामार्गावर गतिरोधक व दिशादर्शक फलक बसवण्यात आले आहेत. मात्र बोरामणी येथे अद्याप कोणतीही उपाययोजना करण्यात आलेली नाही, ही बाब गंभीर असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे. तरी संबंधित विभागाने तात्काळ उपाययोजना कराव्यात, अन्यथा राष्ट्रीय महामार्गावर तीव्र स्वरूपाचे आंदोलन व रस्ता बंद आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही धनेश आचलारे यांनी दिला आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड