
रायगड, 05 जानेवारी (हिं.स.)।
श्रीवर्धन तालुक्यातील मौजे बागमांडला समुद्रकिनाऱ्यावर पहिल्यांदाच नर ग्रीन सी टर्टल (Green Sea Turtle) आढळून आल्याने सागरी जैवविविधतेच्या दृष्टीने ही घटना अत्यंत महत्त्वाची ठरली आहे. बागमांडला येथे फेरीबोटीच्या नवीन जेट्टीच्या एका बाजूला चिखलात एक मोठे कासव वाहून आले असल्याचे लक्षात येताच, तेथे काम करणारे आकाश सुरेश पाडलेकर (रा. वेळास) यांनी तत्काळ कांदळवन कक्ष, दक्षिण कोकण यांच्याशी संपर्क साधला.
माहिती मिळताच कांदळवन विभागाचे अधिनस्त वनरक्षक, कासव तज्ञ आणि कासव मित्रांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. तपासणीत हे कासव ग्रीन सी टर्टल या संरक्षित प्रजातीतील नर असल्याचे स्पष्ट झाले. कांदळवन प्रतिष्ठानचे सहाय्यक संशोधक मोहन उपाध्ये यांनी दिलेल्या माहितीनुसार, रायगड जिल्ह्यात सागरी कासवांच्या पाच प्रजाती आढळतात; मात्र मौजे बागमांडला, श्रीवर्धन येथे नर ग्रीन सी टर्टल प्रथमच सापडल्याची ही नोंद आहे.
सुमारे २०० किलो वजनाच्या या कासवाची डोक्यापासून शेपटीपर्यंत लांबी सुमारे १९० सेंमी (६ फूट ३ इंच), पाठीची लांबी ६५ सेंमी, रुंदी ६२.५ सेंमी आणि शेपटीची लांबी ३६ सेंमी इतकी असल्याचे आढळले. ओहोटीमुळे हे कासव किनाऱ्यावर वाहून आले असावे, असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला. वनकर्मचाऱ्यांनी तपासणी केली असता कासवाला कोणतीही गंभीर दुखापत झालेली नव्हती.
मारळ येथील जयंत कानडे, संकेत मयेकर, हरिहरेश्वर येथील संतोष मयेकर, सुबोध खोपटकर, कांदळवन विभागाचे वनरक्षक तुषार भटे व ऋषिकेश लव्हटे, कासव तज्ञ मोहन उपाध्ये तसेच स्थानिक ग्रामस्थ व फेरीबोटीवरील कर्मचाऱ्यांच्या मदतीने या कासवाला सुरक्षितपणे नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले.
यापूर्वी रायगडच्या किनारपट्टीवर ग्रीन सी टर्टलच्या माद्या आढळल्या होत्या; मात्र नर कासव सापडण्याची ही पहिलीच घटना आहे. अशा प्रकारे समुद्री कासव आढळल्यास तात्काळ कांदळवन विभागास कळवावे, असे आवाहन विभागीय वन अधिकारी (कांदळवन विभाग, दक्षिण कोकण) कांचन पवार यांनी केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके