
चंद्रपूर, 05 जानेवारी (हिं.स.)।
चंद्रपूर महानगरपालिका, चंद्रपूरच्या सार्वत्रिक निवडणूक - 2025-26 च्या पार्श्वभूमीवर आज मुख्य निवडणूक निरीक्षक विजय भाकरे यांनी सर्व संबंधित विभागांचा सविस्तर आढावा घेतला. चंद्रपूर महानगरपालिका स्थायी समिती सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या या बैठकीत निवडणूक तयारी, नियोजन व अंमलबजावणीबाबत सखोल चर्चा करण्यात आली.
या बैठकीस निवडणूक अधिकारी तथा महानगरपालिका आयुक्त अकुनुरी नरेश,भा.प्र.से, सर्व निवडणूक निर्णय अधिकारी,अतिरिक्त पोलिस अधीक्षक ईश्वर कातकाडे,अतिरिक्त आयुक्त चंदन पाटील, उपायुक्त संदीप चिद्रावार,प्रादेशिक परिवहन अधिकारी, किरण मोरे, पोलिस विभागातील वरिष्ठ अधिकारी तसेच विविध विभागांचे प्रमुख उपस्थित होते. यावेळी चंद्रपूर महानगरपालिका आयुक्त अकुनुरी नरेश यांनी निवडणूक विषयक आतापर्यंत करण्यात आलेल्या कामकाजाची सविस्तर माहिती पावर पॉईंट प्रेझेंटेशनद्वारे सादर केली. त्यानंतर मुख्य निवडणूक निरीक्षक यांनी प्रत्येक विभागाचा सूक्ष्म आढावा घेत सर्व यंत्रणांना समन्वयाने काम करण्याचे स्पष्ट निर्देश दिले.
मुख्य निवडणूक निरीक्षक यांनी सांगितले की, निवडणूक कामकाजात येणाऱ्या अडचणी सर्व विभागांनी परस्पर समन्वयाने तातडीने सोडवाव्यात. मागील निवडणुकीतील मतदान टक्केवारीपेक्षा अधिक मतदान या निवडणुकीत होईल, यासाठी प्रभावी नियोजन करावे. गरज भासल्यास लोकप्रतिनिधी व राजकीय पक्षांच्या माध्यमातून मतदारांमध्ये जनजागृती करावी.
निवडणूक विषयक सर्व माहिती, मतदान व मतमोजणी प्रक्रियेबाबतची सविस्तर माहिती सामान्य नागरिक, राजकीय पक्ष व उमेदवारांना वेळेवर उपलब्ध करून देण्याचे निर्देश देण्यात आले. कोणत्याही प्रकारे निवडणूक प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होणार नाही, याची दक्षता घ्यावी व संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने राबवावी, असेही त्यांनी स्पष्ट केले.
मतदान यंत्रे व इतर सर्व निवडणूक साहित्य १०० टक्के कार्यक्षम असल्याची खात्री करावी. नागरिकांना किती उमेदवारांना मतदान करावयाचे आहे, याची स्पष्ट माहिती द्यावी. कोणताही मतदार मतदानापासून वंचित राहणार नाही, यासाठी विशेष काळजी घ्यावी, असे निर्देश यावेळी देण्यात आले.
मतदान व मतमोजणीदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये, तसेच निवडणूक प्रक्रियेत सहभागी प्रत्येक अधिकारी व कर्मचारी हा निवडणूक आयोगाचा प्रतिनिधी असल्याने त्यांच्याकडून कोणतेही अशोभनीय वर्तन होणार नाही, याची कटाक्षाने अंमलबजावणी करण्याचे आदेश देण्यात आले.
---------------
हिंदुस्थान समाचार / एम.पंकजराव