
चंद्रपूर, 05 जानेवारी (हिं.स.)। बेलसणी येथील स्टील प्लांट उभारणीबाबत जिल्हाधिका-यांची अंतिम अधिसूचना प्रसिध्द करण्यात आली आहे.
मिलियन स्टील्स प्रायवेट लिमिटेड कंपनी, नागपूर यांनी मौजा बेलसणी येथे सर्वे नं. 382, 383, 384, 385, 389/1, 389/2, 390, 391, 392, 393, 379 व 380 या जागेवर उच्च क्षमतेचा स्टील प्रकल्प उभारणी करण्यासाठी नमूद सर्वे नंबर शासकीय पाणंद रस्ता स्थलांतर करून सर्व्हे नं. 382, 379, 390, 391, 392, 393, 380 व 381 च्या सीमेलगत पाणंद स्थानांतरण करून मिळण्याबाबत अर्ज सादर केला होता. याबाबत महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 चे कलम 21 अन्वये 23 सप्टेंबर 2025 रोजी प्रारूप अधिसूचना प्रसिद्ध करून 22 डिसेंबर 2025 पर्यंत हरकती व सूचना मागविण्यात आल्या होत्या.
सदर मसुदा संबंधित व्यक्तीकडून 19 नोव्हेंबर 2025 रोजी आक्षेप सादर केला. सदर आक्षेपावर 23 डिसेंबर 2025 रोजी सुनावणी घेण्यात आली. परंतु आक्षेपकर्ता यांनी लेखी अर्ज करून आक्षेप मागे घेतला असल्यामुळे सदरचा आक्षेप गृहीत धरण्यात आला नाही. उपरोक्त आक्षेप व्यतिरिक्त इतर कोणतीही आक्षेप विहित मुदतीत प्राप्त झाला नसल्याने प्रारूप अधिसूचना मध्ये कोणताही बदल करण्यात आला नाही.
त्यामुळे सर्व्हे क्र. 382, 389, 390, 391, 392 व 393 च्या पश्चिमेकडील बाजुने असलेला व सर्व्हे क्र. 379 ते 381 च्या पुर्वेकडील बाजुने असलेला शेणगावकडे जाणारा पाणंद रस्ता स्थलांतरीत करण्यात आला असून सर्व्हे क्र. 381 च्या पूर्व-पश्चिम व त्यानंतर उत्तर दिशेने वळून सर्व्हे क्र. 379 ते 381 च्या पश्चिम दिशेने आवेदकाच्या पूर्णतः शेतातून पाणंद रस्ता शेणगावकडे जाणाऱ्या पाणंद रस्त्याला मिळतो, याबाबतची अंतिम अधिसूचना जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी 1 जानेवारी 2026 रोजी प्रसिध्द केली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / एम.पंकजराव