

छत्रपती संभाजीनगर, 05 जानेवारी (हिं.स.)। घर, पाणी, उद्योग आणि रोजगार : जालन्याच्या भवितव्याचा रोडमॅप असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठणकावून आज जालना येथे सांगितले. जालना महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जालना येथे एक जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती.
जालना महानगरपालिका निवडणुकीसाठी आयोजित 'जाहीर प्रचार सभे'मध्ये उपस्थित जालनावासियांना संबोधित केले. येत्या काळात जालन्यातील एकही कुटुंब कच्च्या घरात राहणार नाही, हा आमचा संकल्प आहे. असे सांगताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की,यासाठी येथे जमिनीच्या मालकी हक्काचे पट्टे वाटपाच्या कामांना येत्या काळात गती देण्यात येणार असून यासोबतच येथे जितक्या घरांची मागणी असेल, तितकी घरे राज्य सरकार देईल.
मागील काळात जालन्यासाठी पाणीपुरवठा योजना मंजूर करून पाईपलाईनचे काम पूर्ण केले असून 8 जलकुंभ कार्यान्वित झाले आहेत. याचाही उल्लेख मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला.जालना शहराचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवण्याचा आमचा निर्धार आहे. जालन्यासाठी सौर ऊर्जा प्रकल्प देखील मंजूर करण्यात आला आहे.
जालना येथील ड्राय पोर्ट आणि हिंदूह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गामुळे स्टील आणि पोलाद उद्योगाचे केंद्र म्हणून जालन्याची ओळख अधिक मजबूत होणार आहे. छत्रपती संभाजीनगर-जालना हा परिसर आता उद्योगांना आकर्षित करत आहे. जालन्यामध्ये आयसीटी शाखा, रिंग रोड व अंतर्गत रस्त्यांसाठी निधी, रेल्वे स्थानकाचा विकास, वैद्यकीय महाविद्यालय, जालना-खामगाव रेल्वेमार्ग अशी अनेक महत्त्वाची कामे आपण मार्गी लावली आहेत. लाडक्या बहिणींसाठी जालन्यात ‘उमेद मॉल’लाही मंजुरी देण्यात आली आहे.
आता जालन्यात भाजपाचा झेंडा फडकवायचा आहे. जालनावासियांनी येत्या 15 तारखेला कमळाची काळजी घ्यावी, पुढील 5 वर्ष जालना शहराची काळजी घेण्याची जबाबदारी आमची असेल. यावेळी आमदार बबनराव लोणीकर, आमदार नारायण कुचे, आमदार संतोष दानवे, माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे पाटीलजी व इतर मान्यवर उपस्थित होते.
----------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis