रायगड - आंबेवाडी नाक्यावर महामार्ग प्रशासनाविरोधात ठिय्या
रायगड, 05 जानेवारी (हिं.स.)। मुंबई–गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६ वरील आंबेवाडी–कोलाड–वरसगाव परिसरात सुरू असलेल्या अपुऱ्या व अन्यायकारक कामकाजाविरोधात नागरिकांचा संताप उफाळून आला असून, आंबेवाडी बाजारपेठेतील द. ग. तटकरे चौकात सोमवार दि. ५ जान
वळसा, अपघात, त्रास; आंबेवाडी नाक्यावर महामार्ग प्रशासनाविरोधात ठिय्या


रायगड, 05 जानेवारी (हिं.स.)।

मुंबई–गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६ वरील आंबेवाडी–कोलाड–वरसगाव परिसरात सुरू असलेल्या अपुऱ्या व अन्यायकारक कामकाजाविरोधात नागरिकांचा संताप उफाळून आला असून, आंबेवाडी बाजारपेठेतील द. ग. तटकरे चौकात सोमवार दि. ५ जानेवारी २०२६ रोजी साखळी उपोषणाला सुरुवात करण्यात आली आहे. मागण्या पूर्ण होईपर्यंत हे उपोषण सुरूच राहणार असल्याचा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला आहे.

आंबेवाडी कोलाड वरसगाव येथील VUP उड्डाणपुलाच्या दोन्ही बाजूंना २०० मीटर अंतरावर अंडरपास बोगदे देण्यात यावेत, अद्याप अपूर्ण असलेले सर्व्हिस रोडचे काम तातडीने पूर्ण करावे, गटारांवरील झाकण बसवावीत, तसेच पेण, नागोठणे, लोणेरे, महाड येथे अंडरपास असताना आंबेवाडी–कोलाडवर अन्याय का, असे प्रश्न उपस्थित करत पंचक्रोशीतील जागरूक नागरिक आंदोलनात सहभागी झाले आहेत.

आंबेवाडी नाका हे विळा–कोलाड, इंदापूर–कोलाड, रोहा–कोलाड, खांब–कोलाड तसेच चिंचवली–अतोणे–कोलाड या मार्गांचे मध्यवर्ती ठिकाण असून दररोज हजारो नागरिकांची येथे ये-जा असते. मात्र अंडरपास नसल्याने नागरिकांना एक किलोमीटरहून अधिक अंतर वळसा घालून प्रवास करावा लागत असल्याने मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे.

यावेळी माजी सरपंच सुरेशदादा महाबळे यांनी सांगितले की, या मागण्यांसाठी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली असून, न्याय मिळेपर्यंत साखळी उपोषण सुरू ठेवले जाईल. तर कुणबी समाजाचे युवानेते विश्वास बागुल यांनी ७२ गावांतील नागरिक, व्यापारी व वाहनचालकांच्या अडचणी मांडत लोकप्रतिनिधींवर तीव्र नाराजी व्यक्त केली.

या आंदोलनात माजी सरपंच, सामाजिक कार्यकर्ते, व्यापारी, तसेच कोलाड परिसरातील असंख्य नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले असून, महामार्ग प्राधिकरणाने तातडीने दखल घ्यावी, अशी जोरदार मागणी होत आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके


 rajesh pande