
रायगड, 05 जानेवारी (हिं.स.)। क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीदिनी तसेच ॲड. उमेश ठाकूर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून भाई जगताप मित्रमंडळ, मा. आमदार मधुकर ठाकूर चॅरिटेबल ट्रस्ट आणि ॲड. उमेश ठाकूर मित्रमंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित भव्य कार्यक्रमात सुप्रसिद्ध कवी, लेखक दिलीप मोकल यांना राज्यस्तरीय कुलाबा जीवनगौरव पुरस्कार २०२६ प्रदान करून गौरविण्यात आले.
साहित्य, समाज आणि अध्यात्म या क्षेत्रातील त्यांच्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत हा सन्मान देण्यात आला. विशेष म्हणजे एकाच दिवशी प्रकाशित झालेल्या निसर्ग, पर्यावरण, सामाजिक, वैचारिक व आध्यात्मिक विषयांवर आधारित त्यांच्या तीन काव्यसंग्रहांनी साहित्यविश्वात विशेष लक्ष वेधून घेतले आहे. यासोबतच आजवर सव्वाशेहून अधिक संतांच्या ओवीस्वरूप रचना त्यांनी साकारल्या असून त्यांचे लेखन वैचारिक समृद्धी देणारे ठरत आहे.
या कार्यक्रमास माजी आमदार भाई जयंत पाटील, आमदार भाई जगताप, खासदार बाळ्या मामा उर्फ सुरेश म्हात्रे, कार्यक्रमाचे अध्यक्ष ॲड. उमेश ठाकूर, ॲड. प्रविण ठाकूर, माजी नगराध्यक्ष प्रशांत नाईक, ॲड. मानसी म्हात्रे यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.
गेल्या पंधरा वर्षांपासून दिलीप मोकल हे सातत्याने लेखन करत असून विविध विषयांवर त्यांनी अनेक दर्जेदार कविता लिहिल्या आहेत. ‘संताचिये गावी’ या सदरातून संतांचे संक्षिप्त ओवीस्वरूप चरित्रलेखन करत देशभरातील विविध भाषा व प्रांतांतील संतांची ओळख सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे.
यापूर्वीही त्यांना राज्यस्तरीय काव्यलेखन पुरस्कार, काव्यरत्न, साहित्यरत्न, साहित्यभूषण तसेच राष्ट्रस्तरीय समाजभूषण अशा अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. कुलाबा जीवनगौरव पुरस्कार २०२६ मिळाल्याने साहित्यप्रेमी व समाजातील विविध स्तरांतून दिलीप मोकल यांचे विशेष अभिनंदन व कौतुक होत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके