
सोलापूर, 05 जानेवारी (हिं.स.)सावित्रीबाई फुले यांचे चरित्र उत्कृष्टरीत्या रेखाटणारी ‘ मी सावित्री जोतीराव’ ही कादंबरी सोलापूरच्या लेखिका डॉ. कविता मुरुमकर यांनी रेखाटली आहे. संशोधात्मक पद्धतीने सावित्रीबाईंचे चरित्र सांगणाऱ्या पहिल्या लेखिका होण्याचा मान सोलापूरच्या लेखिकाला मिळाला असून या कादंबरीचा समावेश द महाराजा सयाजीराव युनिव्हर्सिटी ऑफ बरोडा, वडोदरा, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड या विद्यापीठांच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमात समावेश झाला आहे.डॉ. कविता मुरुमकर यांनी ‘मी सावित्री जोतीराव’ या कादंबरीत महात्मा जोतीराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या जीवनसंघर्षाचा सखोल अभ्यास करून एकोणिसाव्या शतकाचा सर्वांगीण पट चित्रवत उभा केला आहे. अत्यंत तटस्थपणे कादंबरी साकार करण्याचे आव्हान त्यांनी लीलया पेलले आहे. महात्मा फुले यांचा वैचारिक संघर्ष हा विशिष्ट एका जाती–वर्णाच्या विरोधात नसून तो अन्यायकारक विचारप्रणालीच्या विरोधात होता. शोषक–शोषित, न्याय व अन्याय या प्रवृत्तींमधील हा सनातन संघर्ष रेखाटताना आवश्यक असणारा समतोल लेखिकेने यशस्वीपणे हाताळला आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड