
वॉशिंग्टन, 05 जानेवारी (हिं.स.)।अमेरिकेतील मेरीलँड राज्यात 27 वर्षीय भारतीय महिला निकिता गोदिशालाच्या हत्येचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पोलिसांच्या मते, ही हत्या निकिताचा माजी प्रियकर अर्जुन शर्मा याने केल्याचा संशय असून, घटनेनंतर तो भारतात फरार झाला आहे.
हॉवर्ड काउंटी पोलिसांच्या माहितीनुसार, निकिता गोदिशाला एलिकॉट सिटी येथे राहत होती. 2 जानेवारी रोजी तिच्या बेपत्ता होण्याची तक्रार दाखल करण्यात आली होती. तपासादरम्यान, पोलिसांना निकिताचा मृतदेह कोलंबिया, मेरीलँड येथील अर्जुन शर्माच्या अपार्टमेंटमध्ये आढळून आला. मृतदेहावर चाकूने केलेल्या अनेक वारांचे निशाण होते, ज्यामुळे ही हत्या असल्याचा संशय अधिक बळावला आहे.
धक्कादायक बाब म्हणजे, निकिताच्या बेपत्ता होण्याची तक्रार स्वतः अर्जुन शर्मानेच पोलिसांकडे दाखल केली होती. त्याने पोलिसांना सांगितले होते की त्याने निकिताला शेवटचे 31 डिसेंबरच्या संध्याकाळी आपल्या अपार्टमेंटमध्ये पाहिले होते. मात्र, तपासात असे निष्पन्न झाले की 2 जानेवारी रोजी तक्रार दाखल केल्यानंतर लगेचच अर्जुन अमेरिका सोडून भारतात रवाना झाला. त्यामुळे त्याच्यावरील संशय अधिकच गडद झाला आहे.
तपास अधिकाऱ्यांचा अंदाज आहे की 31 डिसेंबरच्या संध्याकाळी सुमारे 7 वाजल्यानंतर निकिताची हत्या करण्यात आली असावी. पोलिसांनी अर्जुन शर्मा याच्याविरोधात प्रथम व द्वितीय श्रेणीतील खुनाच्या आरोपाखाली अटक वॉरंट जारी केले आहे. आरोपीचा शोध घेण्यासाठी अमेरिकेतील संघीय तपास यंत्रणांच्या मदतीने प्रयत्न सुरू आहेत.
या प्रकरणावर वॉशिंग्टन डी.सी. येथील भारतीय दूतावासाने निवेदन जारी करून सांगितले आहे की, ते निकिताच्या कुटुंबाच्या संपर्कात असून त्यांना सर्वतोपरी कांसुलर मदत पुरवली जात आहे. दूतावास स्थानिक अमेरिकन अधिकाऱ्यांशीही सातत्याने संपर्क ठेवून आहे. सध्या हत्येमागील नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही. पोलिसांनी सांगितले आहे की तपास सुरू असून आरोपीला लवकरात लवकर अटक करण्यासाठी प्रयत्न तीव्र करण्यात आले आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode