
छत्रपती संभाजीनगर, 05 जानेवारी (हिं.स.)। छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यातील आगाठाण गावातील जयेश मच्छिंद्र बडोगे यांची आयआयटी कानपूरच्या सीश्रीआय हबमध्ये सायबर सिक्युरिटी रिसर्चर पदावर निवड झाली. जयेश हे शेतकरी कुटुंबातील - असून ग्रामीण भागातून थेट राष्ट्रीय स्तरावरील संशोधन क्षेत्रात पोहोचणारे पहिले युवक ठरले आहेत. जयेश यांचे वडील मच्छिंद्र बडोगे हे शेतकरी आणि आदर्श - शिक्षक आहेत. जयेश यांचे प्राथमिक शिक्षण मराठी व इंग्रजी माध्यमातून झाले.
महाविद्यालयीन शिक्षण लासूर स्टेशन येथील छत्रपती शाहू कॉलेजमध्ये मराठी माध्यमातून पूर्ण केले. त्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातून सायबर सिक्युरिटी आणि डिजिटल फॉरेन्सिक या विषयात पदवी घेतली.पुढील शिक्षणासाठी जयेश यांची निवड राष्ट्रीय रक्षा विद्यापीठ, अहमदाबाद येथे झाली. कठीण इंटर्नस परीक्षेतून त्यांची निवड झाली. तेथे त्यांनी एमएससी डिजिटल फॉरेन्सिक व सायबर सिक्युरिटी हे शिक्षण पूर्ण केले. शिक्षणाच्या शेवटच्या सेमिस्टरमध्येच कॅम्पस निवड प्रक्रियेतून त्यांची आयआयटी कानपूरमध्ये निवड झाली. ही निवड पूर्व परीक्षा आणि थेट मुलाखतीतून झाली.
--------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis