
कोल्हापूर, 05 जानेवारी (हिं.स.)।
निवडणूक आली की आमदार सतीश पाटील कोणती ना कोणती टॅगलाईन काढून प्रसिद्धीच्या झोतात येण्याचा प्रयत्न करतात ,पण नुसत्या टॅगलाईन काढून कोल्हापूरचा विकास होणार नाही .कोल्हापूरचा विकास करायला महायुती सक्षम आहे. त्याचमुळे महायुतीच्या वाढत्या प्रभावाने विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली असल्याची टीका राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांनी केली. शिवालय, शिवसेना जिल्हा मध्यवर्ती कार्यालयात पार पडलेल्या पत्रकार परिषदेतील बोलत होते.
यावेळी बोलताना आमदार राजेश क्षीरसागर म्हणाले की, आ. सतेज पाटील यांनी 2005 पासून सत्तेत असल्याची कबूल केली, हे करत असताना मात्र त्यांनी स्वतःच्या अपयशाचे खापर मात्र नेहमीप्रमाणे दुसऱ्यावर फोडण्याचा प्रयत्न केला आहे. गेल्या सहा वर्षाच्या कालावधीत मी आमदार नसताना देखील कोट्यावधी रुपयांचा निधी आणला. कोल्हापूर जिल्ह्याचे शहराचा विचार करता कन्वेंशन सेंटर, सर्किट बेच ,श्री अंबाबाई तीर्थक्षेत्र विकास आराखडा ,आयटी पार्क ,मंजुरी अमृत 2.0 योजनेतून मल्लनिसारण प्रकल्प, 100 कोटींचे रस्ते असे अनेक प्रश्न मार्गी लावले आहेत. त्याचमुळे महायुतीचा पारदर्शी कारभार आ. सतेज पाटील यांच्या डोळ्यात खूपत आहे. गेले वीस वर्षे सत्तेत असताना आ. सतेज पाटील यांनी शहरातील रस्ते पार्किंग व्यवस्था, कचरा व्यवस्थापन, उद्यानाचे सुशोभीकरण का दिसले नाही किंवा त्यांनी यावर उपाययोजना का केल्या नाहीत याचाही पंचनामा त्यांनी जनतेसमोर मांडणे गरजेचे आहे. गेल्या गणेशोत्सवात आ. सतेज पाटील यांच्या अभ्यंग स्नानाची थेट पाईपलाईन बंद पडली. शहरातील माता भगिनी पाण्यासाठी रस्त्यावर उतरत होत्या, त्यावेळी हे महाशय कुठे गायब होते. पण शिवसेनेने तातडीने पाणीपुरवठ्याची पर्यायी यंत्रणा सुरू करून पाणीपुरवठा सुरळीत केला. एवढ्यावर न थांबता पर्यायी यंत्रणा सक्षम असावी, यासाठी निधीही दिला, हे महायुतीचे काम आहे.
गेले अनेक वर्षे कोल्हापूर महापालिकेतील कंत्राटी कर्मचारी न्यायाच्या प्रतीक्षेत होते. तत्कालीन मुख्यमंत्री व सध्याचे उपमुख्यमंत्री नामदार श्री एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून महापालिकेतील कंत्राटी कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करण्याचे काम आम्ही केले.यासह के. एम. टी. मधील कंत्राटी कर्मचाऱ्यांनाही सेवेत कायम करण्याची काम शिवसेना महायुतीचेच आहे, संगीत सूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाच्या दुर्घटनेनंतर उपमुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे यांनी तात्काळ या ठिकाणी भेट देऊन कोल्हापूरची अस्मिता पुन्हा नव्या दमाने उभी राहण्यासाठी निधी मंजूर केला. याचे काम दर्जेदारच असावे असा कलाप्रेमींचा आग्रह आहे, आणि त्यांच्या सूचनांचा आदर करूनच हे काम पूर्ण केले जात आहे. येत्या 31 मार्च पर्यंत हे काम पूर्ण होईल याची कल्पना कदाचित आदरणीय खासदार छत्रपती शाहू महाराज यांनी आमदार सतेज पाटील यांना दिली नसावी, असा टोलाही आमदार राजेश क्षीरसागर यांनी लगावला.
---------------
हिंदुस्थान समाचार / VijayKumar Pandurang Powar