काँग्रेसच्या बेकारीला भीक घालू नका - प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण
लातूर, 05 जानेवारी (हिं.स.)। केंद्र आणि राज्यात भाजपा सरकार आहे. त्यामुळे काँग्रेसवर बेकारीची वेळ आली आहे. कुठेही सत्ता नसताना विकास कामे करण्याची खोटी आश्वासने आणि भूलथापा काँग्रेसकडून दिल्या जात आहेत. काँग्रेसच्या या भूलथापांना भीक घालू नका, असे
काँग्रेसच्या बेकारीला भीक घालू नका  भाजपा प्रदेशाध्यक्ष आ. रविंद्र चव्हाण : बुथ मेळाव्यात कार्यकर्त्यांना मार्गदर्शन


लातूर, 05 जानेवारी (हिं.स.)। केंद्र आणि राज्यात भाजपा सरकार आहे. त्यामुळे काँग्रेसवर बेकारीची वेळ आली आहे. कुठेही सत्ता नसताना विकास कामे करण्याची खोटी आश्वासने आणि भूलथापा काँग्रेसकडून दिल्या जात आहेत. काँग्रेसच्या या भूलथापांना भीक घालू नका, असे प्रतिपादन भाजपा प्रदेशाध्यक्ष आ. रविंद्र चव्हाण यांनी केले.

लातूर शहर महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने लातूर येथे आयोजित बुथ कार्यकर्त्याच्या मेळाव्यात प्रदेशाध्यक्ष चव्हाण बोलत होते. व्यासपीठावर निवडणूकप्रमुख आमदार संभाजी पाटील निलंगेकर, मराठवाडा संघटन सरचिटणीस संजय कोडगे, आ. रमेशअप्पा कराड, आ. अभिमन्यू पवार, कृषीमूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल, भाजपा नेत्या डॉ. अर्चनाताई पाटील चाकूरकर, ग्रामीण जिल्हाध्यक्ष बस्वराज पाटील मुरुमकर, शहर जिल्हाध्यक्ष अजित पाटील कव्हेकर, माजी खा. सुनिल गायकवाड, माजी आ. त्र्यंबकनाना भिसे, अविनाश कोळी, सुधिर धुत्तेकर यांच्यासह सर्व मंडलाध्यक्षांची उपस्थिती होती.

यावेळी मार्गदर्शन करताना रविंद्र चव्हाण म्हणाले की, ही मनपा निवडणूक केवळ नगरसेवक निवडून देण्यासाठी नाही तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाहिलेले विकसित भारताचे व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतील विकसित महाराष्ट्राच्या स्वप्नपूर्तीसाठी आहे. त्यासाठी लातूरही विकसित झाले पाहीजे. मनपात पारदर्शक कारभार झाला पाहिजे. ही निवडणूक आपल्याला बूथवर जिंकायची आहे. प्रत्येक बूथवर होणाºया मतदानापैकी ५० टक्के पेक्षा अधिक मते आपल्याला मिळाली पाहिजेत. त्यासाठी आगामी १० दिवसात प्रत्येक घर पिंजून काढा. घरातील प्रत्येक व्यक्तीला केंद्र आणि राज्य शासनाच्या योजना समजावून सांगा असे ते म्हणाले.

काँग्रेस कधीही गरिबांसोबत नव्हती याउलट मोदी सरकारने २५ कोटी लोकांना दारिद्रय रेषेच्या बाहेर काढले. लोकहिताच्या अनेक योजना राबविल्या गेल्या. त्यामुळे सर्वसामान्य जनता सुखी झाली. जीएसटीच्या माध्यमातून मिळालेला निधी केंद्राकडून राज्य सरकार व तेथून स्थानिक स्वराज्य संस्थांकडे येतो. यामुळे एक विचाराचे सरकार आवश्यक असून लातूरमध्येही भाजपाचाच महापौर झाला पाहिजे, असेही ते म्हणाले.

कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना आ. संभाजी पाटील निलंगेकर म्हणाले की, स्व. विलासराव देशमुख यांच्या पुण्याईवर दोन वेळा काँग्रेसला लातुरकरांनी निवडून दिले. पुण्याईचा हा चेक आता कॅश होणार नाही तर तो बाऊंस होणार आहे. आता आपल्याला मोदींच्या विकासाचा चेक दिल्लीतून गल्लीत आणायचा आहे. यावर्षी मकरसंक्रातीच्या करीवर मतदान होणार असून ही कर काँग्रेसवर येणार आहे. विधानसभेला राहिलेली कसर महानगरपालिकेला भरून काढा असे आवाहन आ. निलंगेकर यांनी केले.

डॉ. अर्चनाताई पाटील चाकूरकर म्हणाल्या की, भाजपा हा परिवार आहे. पक्षावर विश्वास असल्यानेच मोठ्या प्रमाणात प्रवेश होत आहेत. विधानसभा निवडणूकीत आपण थोड्या मताने पराभूत झाल्याची सल सर्वांच्याच मनात आहे. ही सल भरून काढण्यासाठी महानगरपालिकेत भाजपाचे सर्वच्या सर्व नगरसेवक विजयी करण्याचा निर्धार लातूरकरांनी केला असल्याच्या त्या म्हणाल्या.

प्रास्ताविकात शहर जिल्हाध्यक्ष अजित पाटील कव्हेकर यांनी भाजपाकडे दूरदृष्टी असणारे विकासाची भूमिका घेवून काम करणारे नेतृत्व असल्याचे सांगितले. यामुळेच भाजपा सर्वसामान्य जनतेशी जोडली गेलेली आहे. मनपा निवडणूकीत भाजपा पूर्ण ताकदीने लढत असून मनपात भाजपाचीच सत्ता येण्यासाठी सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते एकदिलाने काम करत असल्याचे सांगितले.

प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले. यावेळी काँग्रेसचे माजी नगरसेवक महादेव बरुरे, धनंजय शेळके, नागसेन कामेगावकर यांच्यासह प्रफुल्ल कांबळे, स्वप्नील माकणे, उमेश धर्माधिकारी, महेश खुरसाळे व असंख्य पदाधिकाºयांनी भाजपात प्रवेश केला. यावेळी दोन अपक्ष उमेदवारांनी भाजपा उमेदवारांना पाठींबा जाहीर केला. यावेळी विकसित लातूरसाठी भाजपाचा जाहीरनामा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण व मान्यवरांच्या हस्ते प्रकाशित करण्यात आला.

आ. संभाजी पाटील निलंगेकर म्हणाले की, संभाजी पाटील निलंग्याचे, अभिमन्यू पवार औश्याचे, रमेश कराड रेणापूरचे असे सांगत काँग्रेसकडून दिशाभूल केली जात आहे.पंरतु माझे घर प्रभाग १७ मध्ये आहे. अभिमन्यू पवार प्रभाग १३ मध्ये राहतात. डॉ. अर्चना पाटील प्रभाग १५ मध्ये राहतात. माजी खा. सुनिल गायकवाड प्रभाग १२ मध्ये राहतात तर आ. रमेश कराड यांचे घरही महापालिकेच्या हद्दीतच आहे. आमच्यावर टीका करणारे अमित देशमुख मात्र मनपा हद्दीच्या बाहेर बाभळगावात राहतात. मग खरा बाहेरचा कोण ? असा सवाल आ. निलंगेकर यांनी उपस्थित केला.

माझे शिक्षण छत्रपती शाहू महाविद्यालयात झाले. रमेशअप्पा कराड रामेश्वर येथे शिकले. डॉ. अर्चनाताई यांचे शिक्षण लातूर येथेच झाले अभिमन्यू पवार केशवराज विद्यालयात शिकले अमित देशमुख मात्र मुंबईत राहून शिकले त्यांना लातूरच्या समस्यांची जाणिवही नाही, असेही आ. निलंगेकर म्हणाले.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande