
लातूर, 05 जानेवारी (हिं.स.)।
भारतीय जनता पक्ष लातूर महानगरपालिका निवडणुकीत पूर्णपणे 'विकासाची' भूमिका घेऊन जनतेच्या दरबारात जात आहे. मात्र, आपला पराभव स्पष्ट दिसत असल्याने काँग्रेसकडून शहरात जातीय द्वेष पसरवून निवडणूक वेगळ्या दिशेला भरकटवण्याचे काम केले जात आहे, असा आरोप माजी मंत्री आ. संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी केला.
पाटील प्लाझा येथील भाजप निवडणूक कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी भाजप शहर जिल्हाध्यक्ष अजित पाटील कव्हेकर, गुरुनाथ मगे, प्रविण सावंत यांसह प्रमुख पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.
ट्रिपल इंजिन' सरकारचा दावा:
केंद्र आणि राज्यात भाजपची सत्ता आहे. लातूर महापालिकेतही भाजपला संधी मिळाल्यास विकासाचे 'ट्रिपल इंजिन' धावेल आणि शहराचा कायापालट होईल.
वारशावर प्रश्नचिन्ह
जनतेने १५ वर्षे तुम्हाला साथ दिली, साहेबांचा वारसा तुमच्याकडे सोपवला; पण खरोखर साहेबांना अभिप्रेत असलेले काम तुम्ही केले का? असा सवाल त्यांनी अमित देशमुख यांचे नाव न घेता उपस्थित केला.
वाहतूक कोंडी आणि 'स्थानिक' नेता: लातूरच्या वाहतुकीचा प्रश्न सोडवण्यासाठी नियोजन हवे. पण त्यासाठी नेत्याने लातूरमध्ये राहणे आवश्यक आहे, असा टोला त्यांनी लगावला.
जातीयवादाला सज्जड इशारा: सोशल मीडियावरून शहराचे सुसंस्कृत वातावरण बिघडवणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचा इशारा निलंगेकर यांनी दिला आहे.
निलंगेकर-देशमुख ही लढाई बाभळगावपासून निलंग्यापर्यंत चालेल, पण लातूर शहर हे विकासाच्या मुद्द्यावरच ठाम राहील!
भाजपचे आगामी 'मिशन लातूर' कार्यक्रम
७ जानेवारी (बुधवार): मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सकाळी ११ वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर पार्क येथे भव्य जाहीर सभा.
मंत्री चंद्रकांत बावनकुळे यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण संघटनात्मक बैठका.
५ जानेवारी (सोमवार): प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत 'साळाई मंगल कार्यालय' येथे विराट कार्यकर्ता मेळावा.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis