
छत्रपती संभाजीनगर, 05 जानेवारी (हिं.स.)।छत्रपती संभाजी नगर महापालिकेची निवडणूक झाल्यावर घेतल्या जाणाऱ्या सर्वसाधारण सभेसाठी जुन्या सभागृहाच्या नूतनीकरणाचे काम आता अंतिम टप्प्यात आले आहे. हे काम पूर्ण करण्यासाठी दहा जानेवारीची अंतिम मुदत ठरविण्यात आली आहे. सभागृहात चार एलईडी स्क्रीन लावण्यात येत असून, संपूर्ण सभागृहात सेंट्रल एसीची व्यवस्था करण्यात आली आहे. नगरसेवकांना बसण्यासाठी आरामदायी सोफा सेट असणार आहेत.
सर्वसाधारण सभेच्या सभागृहाच्या नूतनीकरणाचे काम चार वर्षांपासून
सुरू आहे. मध्यंतरीच्या काळात हे काम बंद होते. परंतु पालिका निवडणूक होणार हे स्पष्ट झाल्यावर काही महिन्यांपासून सभागृहाच्या कामाला वेग आला. आता हे काम अंतिम टप्प्यात आले आहे.
सभागृहाचे काम संपवण्यासाठी दहा जानेवारीची अंतिम मुदत प्रशासनाने संबंधित कंत्राटदाराला आखून दिल्याची माहिती सूत्रांनी दिली.नूतनीकरण करण्यात येणारे सभागृह अद्ययावत असेल. सभागृहात नगरसेवकांना बसण्यासाठी आरामदायी सोफासेट आणि टेबलची व्यवस्था करण्यात आली आहे. एका टेबलवर तीन माइक देण्यात आले आहेत. महापौर, उपमहापौर, आयुक्त आणि सचिव यांच्यासाठी आकर्षक असे व्यासपीठ तयार करण्यात आले आहे.
सभागृहात चार एलईडी स्क्रीन असणार आहेत. एक स्क्रीन महापौरांच्या आसनासमोरच्याभिंतीवर लावण्यात आले आहे. अन्य दोन स्क्रीन नगरसेवकांच्या बैठक व्यवस्थेच्या समोरच्या भिंतीवर लावण्यात आले आहेत. नगरसेवकांना सभागृहाचे कामकाज या स्क्रीनवर पाहता येणार आहे.
संपूर्ण सभागृहात सेंट्रल एसीची व्यवस्था करण्यात आली आहे, त्यामुळे सभागृहाचे वातावरण थंड राहील. संपूर्ण सभागृह सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या निगराणीत असणार आहे. सर्वसाधारण सभेला उपस्थित असणाऱ्या नगरसेवकांची उपस्थिती पूर्वी त्यांच्या जागेवर जाऊन नोंदवली जात होती. आता सभागृहाच्या प्रवेशद्वारावरच स्वागत कक्ष असणार असून, नगरसेवकांना या ठिकाणी उपस्थिती नोंदवून सभागृहात प्रवेश करावा लागणार आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis