कर्जतमध्ये कार्यालयासमोरच गैरप्रकार; स्टॅम्प पेपर विक्रीवर प्रश्नचिन्ह
रायगड, 05 जानेवारी (हिं.स.)। कर्जत तालुक्यात स्टॅम्प व बोंड पेपर खरेदी करताना नागरिकांना शासनाने निश्चित केलेल्या दरापेक्षा अधिक रक्कम मोजावी लागत असल्याच्या तक्रारी समोर येत आहेत. विशेषतः नेरळ परिसरात बोंड पेपरच्या उपलब्धतेबाबत आणि दरांबाबत संभ्र
कार्यालयासमोरच गैरप्रकार; स्टॅम्प पेपर विक्रीवर प्रश्नचिन्ह


रायगड, 05 जानेवारी (हिं.स.)। कर्जत तालुक्यात स्टॅम्प व बोंड पेपर खरेदी करताना नागरिकांना शासनाने निश्चित केलेल्या दरापेक्षा अधिक रक्कम मोजावी लागत असल्याच्या तक्रारी समोर येत आहेत. विशेषतः नेरळ परिसरात बोंड पेपरच्या उपलब्धतेबाबत आणि दरांबाबत संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.

नागरिकांकडून मिळालेल्या माहितीनुसार १०० रुपयांचा बोंड पेपर खरेदी करताना सध्या १३० रुपये, तर ५०० रुपयांच्या बोंड पेपरसाठी सुमारे ५७० रुपये आकारले जात असल्याचे सांगितले जात आहे. यामुळे सामान्य नागरिक, शेतकरी तसेच विविध कायदेशीर कामांसाठी बोंड पेपरची आवश्यकता असणाऱ्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे.

नेरळ येथे दोन अधिकृत परवाना प्राप्त बोंड विक्रेते असल्याची माहिती आहे. मात्र त्यापैकी एक विक्रेता स्वतः दुकानातून विक्री न करता दुय्यम निबंधक कार्यालय परिसरातच बोंड पेपर उपलब्ध करून देत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. त्यामुळे अधिकृत विक्री प्रक्रिया व दरनिश्चितीबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत.

या संदर्भात प्रशासनाशी संपर्क साधला असता, संबंधित अधिकाऱ्यांकडून “अद्याप लेखी स्वरूपात कोणतीही तक्रार प्राप्त झालेली नाही” अशी भूमिका मांडण्यात आली आहे. काही अधिकाऱ्यांनी या बाबत माहिती घेऊन पाहण्याचे आश्वासन दिले असून, प्रत्यक्ष ठिकाणी पाहणी केल्यानंतरच पुढील कारवाईबाबत निर्णय घेता येईल, असेही सांगण्यात आले आहे.

स्टॅम्प व बोंड पेपर हे कायदेशीर व्यवहारांसाठी अत्यंत महत्त्वाचे साधन असल्याने त्याची विक्री पारदर्शक आणि शासननिश्चित दरानुसारच होणे आवश्यक आहे. त्यामुळे या विषयावर प्रशासनाने स्पष्टता आणून योग्य ती तपासणी करावी, तसेच नागरिकांमधील संभ्रम दूर करावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, नागरिकांकडून अधिकृत तक्रारी प्राप्त झाल्यास त्यावर नियमाप्रमाणे कार्यवाही करण्यात येईल, असे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके


 rajesh pande