
रायगड, 05 जानेवारी (हिं.स.)।
अलिबाग तालुक्यातील आक्षी गावात लवकरच नव्या आरोग्य उपकेंद्राची उभारणी होणार असून, या महत्त्वाच्या प्रकल्पाला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे तालुकाप्रमुख शंकर गुरव यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे मंजुरी मिळाली आहे. या आरोग्य उपकेंद्राचे भूमिपूजन सोमवारी (दि. ५) शिवसेना (उबाठा) जिल्हा संपर्कप्रमुख प्रसाद भोईर आणि माजी जिल्हा परिषद सदस्य द्वारकानाथ नाईक यांच्या हस्ते उत्साहात पार पडले. या प्रसंगी गावातील सेवानिवृत्त कर्मचारी तसेच विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या नागरिकांचा सत्कार करण्यात आला.
आक्षी गावाची लोकसंख्या सुमारे २ हजार ९०० इतकी असून, मासेमारी नौका, हॉटेल, कॉटेज आणि विविध व्यवसायांसाठी सुमारे २ हजार ५०० नागरिक परजिल्हा व परराज्यातून येथे वास्तव्यास आहेत. एवढ्या मोठ्या लोकसंख्येसाठी गावात शासकीय आरोग्य सुविधा नसल्याने ग्रामस्थांना उपचारासाठी दूर जावे लागत होते. त्यामुळे आक्षी येथे स्वतंत्र आरोग्य उपकेंद्र सुरू करण्याची मागणी दीर्घकाळापासून होत होती. या मागणीची दखल घेत शंकर गुरव यांनी शासकीय पातळीवर सातत्याने पाठपुरावा करत अखेर उपकेंद्र मंजूर करून घेतले.
या उपकेंद्रासाठी अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज अशी इमारत उभारण्यात येणार असून, त्याचे भूमिपूजन सोमवारी पार पडले. कार्यक्रमावेळी जिल्हा सल्लागार सतीश पाटील, उपजिल्हाप्रमुख प्रशांत मिसाळ, उपजिल्हा संघटक अजित पाटील, विधानसभा संघटक कृष्णा कडवे, तालुका महिला आघाडी संघटिका स्नेहल देवळेकर, आक्षी सरपंच रश्मी पाटील, उपसरपंच आनंद बुरांडे, माजी जिल्हा परिषद सदस्या अश्लेक्षा नाईक यांच्यासह अनेक पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी बोलताना प्रसाद भोईर म्हणाले, “रस्ते आणि पूल म्हणजेच विकास नव्हे, तर शिक्षण व आरोग्य क्षेत्रातील सुविधा हाच खरा विकास आहे. गावाच्या आरोग्य गरजा ओळखून शंकर गुरव यांच्या प्रयत्नातून हे उपकेंद्र मंजूर झाले आहे.” तर द्वारकानाथ नाईक यांनी, “या आरोग्य केंद्रामुळे गावातील नागरिकांना स्वस्त व दर्जेदार आरोग्य सेवा उपलब्ध होणार असून, येथे कायमस्वरूपी वैद्यकीय अधिकारी व परिचारिका उपलब्ध राहतील यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत,” असे सांगितले.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके