
पुणे, 05 जानेवारी (हिं.स.)। काँग्रेस पक्षाकडे पुणे मनपा निवडणुकीसाठी एकूण ४०० उमेदवारी अर्ज आले होते. १६५ जागांवर आमच्याकडे सक्षम उमेदवार होते. पण समविचारी पक्ष एकत्रित घेऊन मतविभाजन टाळण्याचा आमचा प्रयत्न शेवटपर्यंत सुरू होता. जे बिनविरोध निवडून आले ते नगरसेवक लोकभावनेवर निवडून आलेले नाही. भाजपने ज्या पद्धतीने आर्थिक मार्गाने लोकशाहीला घातक ठरणारी बिनविरोध निवड प्रक्रिया सुरू केली ती अयोग्य आहे. एखाद्यावर दबाव निर्माण करून अर्ज माघारी घेण्यास लावणे चुकीचे आहे. राजकीय पक्षाचा उमेदवार असला तर एबी फॉर्मसह उमेदवारी माघारी घेताना सोबत पक्षाचे वतीने देखील प्रमुखाची सही हवी अशी मागणी आम्ही करणार आहे असे मत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे वरिष्ठ उपाध्यक्ष मोहन जोशी यांनी व्यक्त केले. पुणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्ष व शिवसेना( उद्धव बाळासाहेब ठाकरे गट ) यांची आघाडी असून या आघाडीच्या वतीने महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ उपाध्यक्ष व माजी आमदार मोहन जोशी यांची पत्रकार परिषद सोमवारी काँग्रेस भवन येथे आयोजित करण्यात आली त्यावेळी ते बोलत होते. यावेळी माजी नगरसेवक वीरेंद्र किराड,पुणे शहर काँग्रेसचे उपाध्यक्ष अजित दरेकर,सरचिटणीस प्राची दुधाने,युवक काँग्रेस अध्यक्ष सौरभ अमराळे हे उपस्थित होते. जोशी म्हणाले,काँग्रेस पक्षाकडून मनपा निवडणूक प्रचार मोहीम प्रारंभ सुरू करण्यात आला आहे. काँग्रेस पक्ष आणि शिवसेना( उद्धव बाळासाहेब ठाकरे गट ) यांची आघाडी निवडणुकीत झाली आहे. काँग्रेस पक्ष या निवडणुकीत सुमारे १०० जागा लढत असून महादेव जानकर यांचा रासपा पक्ष,आम आदमी पक्ष यांना काही जागा देण्यात आल्या आहे.तर शिवसेना ६५ जगावर लढत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांगतात,महायुती म्हणून आम्ही निवडणुकीस सामोरे जाणार पण,सत्ते मधील इतर दोन पक्ष त्यांच्या सोबत पुणे आणि पिंपरी चिंचवड मध्ये नाही. पालकमंत्री अजित पवार यांनी पुणे व पिंपरी चिंचवड मनपा मध्ये भाजपाने केलेल्या भ्रष्टाचाराची पोलखोल केली आहे. मात्र,तरीदेखील ते राज्यात सत्तेत सहभागी आहे. भाजपचा खरा विरोधक काँग्रेस पक्षच आहे. सर्व जाती धर्म यांना सोबत घेऊन जाणारा काँग्रेस पक्ष आहे. भाजपने मनपात अकार्यक्षम कारभार केला असून याविरोधात काँग्रेसने वेळोवेळी आवाज उठवला आहे. भाजप आणि त्यांचे सहकारी पक्ष यांची निवडणुकीत केवळ नुरा कुस्ती सुरू आहे. विरोधक यांना प्रसारमाध्यमात जागा मिळू नये म्हणून प्रयत्न सुरू आहे. काँग्रेस आणि शिवसेना( उद्धव बाळासाहेब ठाकरे गट ) यांचा एकत्रित प्रचार होणार असून दोन्ही पक्षाचे वरिष्ठ नेते प्रचारात येणार आहे. आघाडीचा जाहीरनामा ८ जानेवारी रोजी प्रसिद्ध केला जाईल.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु