
परभणी, 05 जानेवारी (हिं.स.)। येथील कै.कमलताई जामकर यांच्या स्मृती प्रित्यर्थ देण्यात येणारा दर्पण पुरस्कार- मेळघाटच्या आदीवासी बांधवांना अविरत रुग्णसेवा देणाऱ्या थोर समाजसेविका पद्मश्री डॉ. स्मिता रवींद्र कोल्हे यांना. सन २०२४-२५ या वर्षासाठी दिला जाणारा कै.सौ.कमलताई जामकर दर्पण पुरस्कार दर्पण पुरस्कार निवड समितीच्या वतीने जाहीर करण्यात आला आहे.
महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री रावसाहेब जामकर यांनी आपल्या सुविद्य पत्नी कै.सौ.कमलताई जामकर यांच्या निधना नंतर त्यांच्या नावे सामाजिक क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या महिलेला दर्पण पुरस्कार देण्याचे ठरविले . तेव्हापासून आजतागायत ही परंपरा सुरू आहे. पुरस्काराचे हे २३ वे वर्ष असून यापूर्वी साहित्यिक रेखा बैजल , डॉ. वृषाली किन्हाळकर , डॉ.मेबल आरोळे ,अनाथांची माता सिंधुताई सपकाळ, डॉ.राणी बंग , डॉ. हेमलता पाटील ,ॲड.सुरेखा दळवी, कु. नसीमा म हुरजूक, वैशाली पाटील, प्रतिभा शिंदे , डॉ.मंदाताई आमटे, मायाताई सोरटे, रेहमतबी करीम बेग मिर्झा, सुमनसिंह चव्हाण व मिठू देवी, सुलोचना कडू, आंतरराष्ट्रीय स्तरावर मा.इ.टी.नेपालच्या अनुराधा कोइराला, डॉ.ज्योत्स्ना कुकडे, पिंजारी बाई उल्या पावरा , पद्मश्री राहीबाई सोमाजी पोपेरे, सुशीला विठ्ठलराव साबळे ,मनोरुग्णाची आई श्रीमती योजना घरत या मान्यवर महिलांना आता पर्यंत या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
सन २०२४-२५ या वर्षीच्या पुरस्काराच्या मानकरी समाजधुरीण पद्मश्री डॉ.स्मिता व रविंद्र कोल्हे यांनी १९८८ साली कोर्ट मॅरेज केले. डॉ .स्मिता रवींद्र कोल्हे या ध्येयवेड्या दांपत्याने सातपुडा पर्वतरांगातील बैरागड येथे आपल्या समाज सेवेला सुरुवात केली. गेल्या चार दशकांपासून मेळघाटातील बैरागड येथे आदिवासीं साठी एक रुपया डॉक्टर या निष्ठेने वैद्यकीय सेवा देत निरोगी समाज निर्माण कार्यात मोलाचे योगदान दिले आहे. समाजातील अज्ञान,अंध:श्रद्धा निर्मूलनासाठी वैज्ञानिक दृष्टिकोन रुजविणारे प्रबोधन पर जनजागरणाचे कार्य करत समृध्द समाज ,सक्षम व निरोगी मुली, महिला व माता , कुपोषित बालकांचे आरोग्याची काळजी घेत सदृढ बालक व त्यांचा सर्वांगिण विकास , युवक - युवतीं च्या माध्यमातून समाज मनात विधायक विचारांची रुजवण व्हावी यासाठी मेळघाट पर्यटनातून समाज जीवनाचा अनुभव घेत तरुणाई च्या माध्यमातून सुजाण समाजाची जडणंघडणं करणारे शिबीरातून आदर्श समाज बांधणीचे कार्य सुरू केले. डॉ .रवींद्र आणि डॉ.स्मिता ताईंच्या हाताला चांगला गुण येत असल्याने आदिवासी स्त्री - पुरुषांना आपल्या आरोग्याची काळजी घेण्या बाबत. विशेषतः स्त्रियांनी अंध:श्रद्धा नाकारत स्वतःच्या आरोग्याची जाणिवपूर्वक काळजी घेत आपला आहार,आरोग्य, स्वच्छता,कुटुंबाचे पालन पोषण आदी जबाबदारी पार पाडताना स्वतः कडे लक्ष देत सबल व्हावे ही जाणिव वाढीस लागली.अहोरात्र सेवा समर्पणातून आदिवासींच्या जीवनात अमुलाग्र बदल घडविण्याचे महान कार्य डॉ.स्मिता कोल्हे यांनी केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis