पुणे महापालिका निवडणुकीसाठी ३५० महिला निवडणूक रिंगणात
पुणे, 05 जानेवारी (हिं.स.)। महापालिका निवडणुकीसाठी विविध राजकीय पक्षांच्या तब्बल ३५० महिला निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या आहेत. सर्वाधिक महिला उमेदवारांना भाजप व त्यापाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने आपापल्
PMC news


पुणे, 05 जानेवारी (हिं.स.)। महापालिका निवडणुकीसाठी विविध राजकीय पक्षांच्या तब्बल ३५० महिला निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या आहेत. सर्वाधिक महिला उमेदवारांना भाजप व त्यापाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने आपापल्या प्रभागांचे नेतृत्व करण्याची संधी दिली आहे. या संधीचे सोने करण्याची किमया कोणाला साधता येणार?, याचे उत्तर निवडणुकीच्या निकालानंतरच मिळणार आहे.महापालिका निवडणुकीसाठी पुरुषांप्रमाणेच महिला उमेदवारांनी पाच ते सहा महिन्यांपासून आपापला प्रभाग चांगलाच पिंजून काढला होता. महिला, ज्येष्ठ नागरिक, लहान मुलांसाठी सामाजिक उपक्रम, सांस्कृतिक कार्यक्रमांसह विविध प्रकारच्या छोट्या-मोठ्या कार्यक्रमांचे आयोजन करून निवडणुकीसाठी इच्छुक असणाऱ्या महिला उमेदवारांनी जनसंपर्क वाढविण्यावर भर दिला होता. पाणी, कचरा, वीज, मुलांच्या शाळांचे प्रवेश, नोकरीच्या संधी, राज्य सरकारच्या विविध योजनांद्वारे नागरिकांचे प्रश्‍न सोडविण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून केला जात होता.दरम्यान, निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर महिला उमेदवारांसह त्यांचे पती, वडील, भाऊ यांनी आपल्याच कुटुंबात उमेदवारी कशी मिळेल, यादृष्टीने प्रयत्न करण्यास सुरुवात केली. तेवढ्यावरच न थांबता, आपल्या पक्षाने उमेदवारीला नकार दिल्यास पर्यायी व्यवस्था तयार ठेवली होती.त्यानुसार, विविध राजकीय पक्षांच्या मुलाखतींना त्यांनी हजेरी लावली होती. काही महिलांना आपल्या पक्षाने उमेदवारी दिली, तर काही राजकीय पक्षांनी आपली राजकीय गणिते जुळविण्यासाठी सक्षम महिला उमेदवारांना संधी दिली. त्यामुळे नाराज झालेल्या महिलांनी विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांची तत्काळ भेट घेऊन आपले तिकीट निश्‍चित केले होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande