
कोल्हापूर, 05 जानेवारी (हिं.स.) – महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीचे नेते आणि काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार सतेज पाटील यांनी थेट पाईपलाईन योजनेवरील भ्रष्टाचाराच्या आरोपांचा प्रखर विरोध केला आहे.
आमदार सतेज पाटील यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले की, काळामवाडी थेट पाईपलाईन हा त्यांचा ड्रीम प्रोजेक्ट असून, त्यात कोणताही भ्रष्टाचार घडलेला नाही. त्यांनी योजनेच्या तांत्रिक बाबींचा सखोल आढावा मांडत विरोधकांच्या आरोपांना खोटे ठरवले.सतेज पाटील यांनी सांगितले की, निवडणुकीच्या वेळी विरोधक योजनेचा मुद्दा उठवतात आणि निवडणूक संपल्यावर तो बाजूला करतात. कोल्हापूरच्या जनतेला यामागचे खरे वास्तव समजावे, असे ते म्हणाले आणि थेट पाईपलाईन योजनेच्या मंजुरीपासून निधी, अडथळे, परवानग्या आणि वितरणातील अडचणींविषयी संपूर्ण माहिती पत्रकारांसमोर मांडली.
आमदार पाटील यांनी केंद्र सरकारकडून तिसऱ्या टप्प्यासाठी निधी मिळालेला असल्याने भ्रष्टाचाराचे आरोप कसे होऊ शकतात असा थेट सवाल केला. त्यांनी विरोधक ना. चंद्रकांत पाटील यांच्यावर पलटवार करत म्हटले की, जर योजनेत भ्रष्टाचार झाला असता, तर केंद्र सरकार निधी का दिला असता? तसेच, भाजपच्या राज्य सरकारने आठ वर्षे चौकशी का केली नाही? असेही त्यांनी विचारले.सतेज पाटील यांनी पुढे सांगितले की, योजनेत कामात आलेले थांबे मुख्यतः वनविभाग आणि पाटबंधारे विभागाच्या परवानग्या न मिळाल्यामुळे झाले. २०१४ पासून सुरू असलेली योजनेची प्रक्रिया, मंजुरी, निधीची रक्कम आणि ५५ बैठका याचा तपशील त्यांनी मांडला. योजनेमुळे महापालिकेवरील विजेचा भार आणि पाटबंधारे विभागाकडील पाणीपट्टीचा अंदाजे ३० कोटींपेक्षा अधिकचा भार कमी झाला आहे.
आमदार पाटील यांनी स्पष्ट केले की, थेट पाईपलाईनचे पाणी शहरापर्यंत पोहचवण्याची जबाबदारी पालिकेची होती. तसेच, योजनेच्या ठेकेदारावर पालिकेने दंड लावला असून, चंद्रकांत पाटील यांनी त्याची मदत करावी, असेही त्यांनी सुचवले.सतेज पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिलेल्या भूमिकेत असे म्हटले की, मी पोलिसांना निवडणुकीच्या काळात बंदोबस्त देण्याची विनंती करणार आहे. पुढील दहा दिवस आम्ही फक्त आमच्या जाहीरनाम्याचे आणि विकासकामांचे नियोजन जनतेसमोर मांडू.
---------------------------
हिंदुस्थान समाचार / VijayKumar Pandurang Powar