
पुणे, 05 जानेवारी (हिं.स.)। राज्य रस्ते विकास महामंडळाने हाती घेतलेल्या रिंगरोडच्या नऊही टप्प्यांचे काम सुरू झाले आहे. पश्चिम टप्प्याचे काम प्रगतिपथावर असून, पुढील दोन वर्षांत हे काम पूर्ण करण्याचा प्रयत्न असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे अधीक्षक अभियंता राहुल वसईकर यांनी दिली.दरम्यान राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (एनएचआय) महामंडळाकडे वर्ग केलेल्या ३१ किलोमीटर रिंगरोडच्या कामाची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असून, लवकरच त्याचे काम सुरू करणार असल्याचे त्यांनी सांगितले.पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील वाहतुकीची कोंडी फोडण्यासाठी महामंडळाकडून या रस्त्याचे काम हाती घेण्यात आले आहे. पूर्व आणि पश्चिम अशा दोन टप्प्यांत हे काम केले जात असून पश्चिम टप्प्याचे काम सुमारे २० टक्क्यांपर्यंत झाले आहे. पावसाळा संपल्यामुळे या कामाला वेग आला असून मे अखेर महत्त्वाची कामे पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.पश्चिम टप्प्यातील रस्त्याच्या कामासाठी डिसेंबर २०२७ पर्यंत मुदत दिली आहे. त्या मुदतीत हे काम पूर्ण करण्याचा प्रयत्न असल्याची माहिती वसईकर यांनी दिली. पूर्व टप्प्याचे काम पूर्ण करण्यासाठी मे २०२८ पर्यंत मुदत दिली आहे. त्यावेळी संपूर्ण रिंगरोड पूर्ण करून वाहतुकीसाठी खुला करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु