५ हजारांची साडी ५९९ रुपयांत; ऑफरमुळे संभाजीनगरात चेंगराचेंगरी
छत्रपती संभाजीनगर, 05 जानेवारी (हिं.स.)। छत्रपती संभाजीनगर शहरात पाच हजाराची साडी 599 रुपयांत मिळणार या ऑफर्समुळे महिलांच्या झालेल्या गर्दीमुळे चेंगराचेंगरी झाल्याची घटना घडली आहे. चेंगराचेंगरीत लहान मुलांची आईपासून ताटातूट आणि 3 जणी बेशुद्ध पडल्य
अ


छत्रपती संभाजीनगर, 05 जानेवारी (हिं.स.)। छत्रपती संभाजीनगर शहरात पाच हजाराची साडी 599 रुपयांत मिळणार या ऑफर्समुळे महिलांच्या झालेल्या गर्दीमुळे चेंगराचेंगरी झाल्याची घटना घडली आहे. चेंगराचेंगरीत लहान मुलांची आईपासून ताटातूट आणि 3 जणी बेशुद्ध पडल्या. अखेर पोलिसांनी तातडीने दुकान बंद पाडल्यानंतर गर्दी कमी झाली. मकरसंक्रांतीनिमित्त साड्यांवरील मोठ्या सवलतींच्या ऑफर्समुळे संभाजीनगर शहरातील आकाशवाणी ते त्रिमूर्ती चौक परिसरात थरार पाहायला मिळाला.

5 हजार रुपयांची साडी अवघ्या 599 रुपयांत मिळणार या बातमीने तब्बल 1000 हून अधिक महिला आणि मुलींनी एकाच वेळी दुकानावर गर्दी केली. या तुफान गर्दीत झालेल्या चेंगराचेंगरीत 3 महिला श्वास गुदमरून बेशुद्ध पडल्या, तर अनेक लहान मुलांची आईपासून ताटातूट झाल्याने परिसरात एकच घबराट पसरली. त्रिमूर्ती रोडवरील या नवीन साडी सेंटरचे उद्घाटन होते. गेल्या ३ महिन्यांपासून स्थानिक रीलस्टार्समार्फत 199 ते 599 रुपयांमधील साड्यांचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केले जात होते. उद्घाटन होऊन दुकान उघडताच महिलांनी आत शिरण्यासाठी एकच गर्दी केली. काही वेळातच रस्ता पूर्णपणे जाम झाला आणि परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली.

दुकानात महिलांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्याने स्थानिक नागरिकांनी पोलिसांना कळवले. जवाहरनगर पोलीस ठाण्याचे निरीक्षक सचिन कुंभार यांनी तातडीने पथकासह धाव घेतली. गर्दी पांगवण्यासाठी पोलिसांनी माईकचा वापर केला. 'ही ऑफर केवळ आजपुरती नसून 365 दिवस राहणार आहे,' असे जाहीर केल्यानंतर आणि बळाचा वापर करण्याचा इशारा दिल्यानंतर ही गर्दी निवळली.

------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande