
रत्नागिरी, 5 जानेवारी, (हिं. स.) : स्वतःचे संरक्षण करता येणे ही काळाची गरज आहे आणि त्यासाठी तायक्वांदोसारखा मार्शल आर्टचा प्रकार आजच्या काळातल्या मुलींनी तसेच मुलांनीही अवश्य शिकून घ्यावा, असे आवाहन नगरसेविका मेधा अविनाश कुलकर्णी यांनी केले आहे.
रत्नागिरी नगर परिषदेच्या वॉर्ड क्रमांक सहाच्या नगरसेविका सौ. मेधा अविनाश कुलकर्णी यांनी ईगल तायक्वांदो प्रशिक्षण केंद्राच्या प्रशिक्षिका आणि राष्ट्रीय पंच संकेता संदेश सावंत यांची भेट घेतली. त्यावेळी त्यांनी हे मत व्यक्त केले.
गेल्या वर्षभरापासून अभ्युदय नगर नगरपरिषद बहुउद्देशीय सभागृहात ईगल तायक्वांदो प्रशिक्षण केंद्र सुरू आहे. या प्रशिक्षण केंद्रात आजूबाजूच्या परिसरातील मुले तायक्वांदोचे प्रशिक्षण घेतात. नुकत्याच झालेल्या बेल्ट ग्रेडेशन परीक्षेतही या प्रशिक्षण केंद्रातील खेळाडूंनी उत्तम यश संपादन केले आहे. तायक्वांदोचे प्रशिक्षण देत असतानाच संकेता संदेश सावंत यांनी नुकतेच लातूर तसेच गोवा येथे राज्यस्तरीय तायक्वांदो स्पर्धेसाठी पंच म्हणून काम केले. पदकविजेती खेळाडू, राष्ट्रीय पंच ते प्रशिक्षक अशा तिच्या या प्रवासाची नगरसेविका सौ. मेधा कुलकर्णी यांनी प्रत्यक्ष भेटीत माहिती घेतली.
यावेळी ईगल तायक्वांदो प्रशिक्षण केंद्रासाठी लागेल ते सहकार्य करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. संकेता संदेश सावंत हिला पुढच्या यशस्वी वाटचालीसाठी आणि भविष्यात उत्तम खेळाडू घडवण्यासाठी शुभेच्छा दिल्या.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी