
लातूर, 05 जानेवारी (हिं.स.)न्याय द्या, नाहीतर खुर्ची सोडा! अशा घोषणांनी आज लातूरचा दयानंद गेट परिसर दणाणून गेला. पोलीस उपनिरीक्षक (PSI) भरती प्रक्रियेतील दिरंगाईमुळे स्वप्न भंगण्याच्या उंबरठ्यावर असलेल्या हजारो विद्यार्थ्यांनी वयोमर्यादा वाढीच्या मागणीसाठी आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. या लढ्याला आता NSUI ने आपला जाहीर पाठिंबा दर्शवत मैदानात उडी घेतली आहे.
आंदोलनाचे मुख्य कारण:
गेल्या काही काळापासून भरती प्रक्रियेत झालेला प्रचंड विलंब आणि जाहिरातींमधील अनिश्चितता यामुळे अनेक प्रामाणिक कष्ट करणारे विद्यार्थी वयोमर्यादेच्या अटीत अडकले आहेत. प्रशासकीय दिरंगाईची शिक्षा आम्हाला का? असा संतप्त सवाल परीक्षार्थी विचारत आहेत.
प्रमुख मागण्या:
PSI भरतीसाठी वयोमर्यादा किमान २ वर्षांनी वाढवण्यात यावी. रखडलेल्या भरती प्रक्रिया तात्काळ मार्गी लावाव्यात.
विद्यार्थ्यांच्या भविष्याचा विचार करून शासनाने संवेदनशील निर्णय घ्यावा.
विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी खेळू नका! जर सरकारने वेळीच दखल घेतली नाही, तर हे आंदोलन संपूर्ण महाराष्ट्रभर पेटेल, असा इशारा जिल्हाध्यक्ष रोहित बिराजदार, महेश साळुंके व उपस्थित पदाधिकाऱ्यांनी दिला.
दयानंद गेटवर जमलेल्या या जनसमुदायाने आता राज्य सरकारचे लक्ष वेधले असून, 'लातूर पॅटर्न' आता संघर्षाच्या रूपाने समोर येत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis