

रायगड, 05 जानेवारी (हिं.स.)।
तळा नगरपंचायतीची प्रस्तावित प्रशासकीय इमारत ही केवळ प्रशासकीय कामकाजापुरती मर्यादित न राहता तळा शहराच्या वैभवात भर घालणारी, दर्जेदार व भविष्याचा विचार करून उभारण्यात येईल. या इमारतीमुळे नागरिकांना एकाच छताखाली विविध सेवा-सुविधा उपलब्ध होतील आणि प्रशासन अधिक गतिमान, पारदर्शक व लोकाभिमुख बनेल, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.
नागरी सेवा व सुविधा योजनेअंतर्गत तळा नगरपंचायतीच्या नवीन प्रशासकीय इमारतीचा भूमिपूजन सोहळा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते तळा येथे पार पडला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी महिला व बालविकास मंत्री कु. अदिती तटकरे, खासदार सुनील तटकरे, माजी आमदार अनिकेत तटकरे, तळा नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा श्रीमती माधुरी घोलप, उपनगराध्यक्ष चंद्रकांत रोडे, नगरपंचायत सदस्य, जिल्हाधिकारी किशन जावळे, जिल्हा पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री अजित पवार पुढे म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेला तळा तालुका ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे. तळागड किल्ला हा मराठा साम्राज्यात टेहळणी व संरक्षणाचे महत्त्वाचे केंद्र होता. असा ऐतिहासिक व निसर्गसंपन्न परिसर आज विकासाच्या नव्या मार्गावर वाटचाल करत आहे. कोकणातील निसर्गसौंदर्य, समुद्रकिनारे, हिरवीगार शेती व धबधब्यांमुळे पर्यटनाला मोठी संधी उपलब्ध आहे.
महायुती सरकार राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असून उद्योगांच्या माध्यमातून तरुणांना रोजगार, तर बचत गटांद्वारे महिलांना आर्थिक सक्षमतेच्या संधी दिल्या जात आहेत. CIIIT प्रकल्पाच्या माध्यमातून टाटा कंपनी व राज्य सरकारच्या सहकार्याने आधुनिक शिक्षण देण्यात येत असून, एआयसारख्या नव्या तंत्रज्ञानासाठी तरुणांना तयार केले जात आहे, असेही त्यांनी नमूद केले.
तळा नगरपंचायतीच्या प्रशासकीय इमारतीसाठी शासनाकडून ८.५० कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून त्यापैकी ५० टक्के निधी वितरित करण्यात आला आहे. काम दर्जेदार व वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. तसेच ग्रामदैवत आई चंडिका माता मंदिराच्या जिर्णोद्धारासाठी एक कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्याची घोषणाही त्यांनी यावेळी केली.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके