
अमरावती, 05 जानेवारी (हिं.स.)।अमरावती महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत आमदार रवी राणा यांनी आक्रमक भूमिका घेत राजकीय वातावरण तापवले आहे. “लोकसभा निवडणुकीत नवनीत राणा यांच्या विरोधात प्रचार करणारे आणि भाजपसोबत गद्दारी करणाऱ्यांना या निवडणुकीत धडा शिकवणार,” असा थेट इशारा देत रवी राणा यांनी विरोधकांवर हल्लाबोल केला. आगामी निवडणुकीत निर्णायक भूमिका बजावण्याचा दावा केला आहे.लोकसभा निवडणुकीत झालेल्या कथित गद्दारीचा बदला महापालिका निवडणुकीत घेतला जाईल, असे सांगत नवनीत राणा यांनी काल साईनगर परिसरात युवा स्वाभिमान पक्षाच्या उमेदवाराच्या समर्थनार्थ प्रचार केला. या प्रचारादरम्यान रवी राणा यांनी भाजपचे उमेदवार तुषार भारतीय यांच्यावरही थेट निशाणा साधत अंतर्गत नाराजी उघड केली.“नवनीत राणा यांच्या लोकसभा निवडणुकीत YSP चे उमेदवार सचिन भेंडे यांनी प्रचंड मेहनत घेतली, जीव ओतून काम केले. तरीही गद्दारी करणाऱ्यांना माफ केले जाणार नाही,” असे स्पष्ट शब्दांत रवी राणा म्हणाले. ज्यांनी ज्यांनी लोकसभा निवडणुकीत गद्दारी केली, त्यांच्या विरोधात आम्ही जाहीरपणे प्रचार करू, असेही त्यांनी ठणकावून सांगितले.युवा स्वाभिमान पक्षाची ताकद अधोरेखित करताना रवी राणा म्हणाले, “ज्या प्रभागात युवा स्वाभिमानचे उमेदवार मजबूत आहेत, त्या ठिकाणी भाजप आमच्यासोबत काम करेल. जिथे स्वाभिमानचे उमेदवार आहेत, तिथेच भाजपची ताकद उभी राहील.” अमरावती महानगरपालिकेवर भाजपचाच महापौर बसेल, असा ठाम दावाही त्यांनी केला.युवा स्वाभिमानचे तब्बल 30 नगरसेवक निवडून येतील आणि निवडून आल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते त्यांचा सत्कार होईल, असा विश्वास रवी राणा यांनी व्यक्त केला. या आक्रमक वक्तव्यांमुळे अमरावतीतील राजकारण अधिकच तापले असून महापालिका निवडणूक चुरशीची होण्याची चिन्हे स्पस्ट झाले आहे.
------------------
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी