
अमरावती, 05 जानेवारी (हिं.स.) सावधान महिलांनो…..महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत आता तुमच्या घरात तुम्हाला दहा दिवस घरकाम करणारी केर, कचरा काढणारी, झाडू, पोछा करणारी, धुणीभांडी करणारी महिला दिसणार नाही. त्याला कारण ही महिला आता सर्व पक्षीय उमेदवाराच्या प्रचारात ३०० ते ५०० रूपये रोजंदारीने कामाला लागली आहे. त्यामुळे आता या सर्व महिला सुटीवर गेल्या आहेत. दरम्याान घरकाम करणाऱ्या महिला प्रचारात गेल्याने घराघरात आरडा ओरड आणि भांडी वाजण्याचा आवाज सुरू झाला आहे.
महापालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. या रणधुमाळीत निवडणुक कुठलीही असो प्रचारासाठी आता कार्यकर्त्यांची तसेच पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची संख्या रोडावत चालली आहे. या कार्यकर्त्यांची जागा रोजंदारीने घरोघरी धुणीभांडी, घरकाम करणाऱ्या महिलांनी घेतली आहे. अमरावती शहरात बहुसंख्य घरात धुणे, भांडी तसेच घरकाम करणाऱ्या महिला संख्येने अधिक आहेत. मात्र या सर्व महिला आता सर्वपक्षीय उमेदवारांच्या निवडणुक प्रचारात गुंतलेल्या आहेत. या महिलांना उमेदवारांकडून किमान ३०० ते ५०० रूपये रोजी दिली जाते. या महिला सकाळी नऊ ते सायंकाळी सहा या वेळेत उमेदवारांची प्रचार पत्रके घरोघरी जावून वाटप करतात, उमेदवारांच्या रॅलीत झेंडे घेवून सहभागी होतात. त्यामुळेच ४ जानेवारी पासून बहुसंख्य घरातील घरकाम करणाऱ्या महिला सुटीवर गेल्याचे चित्र दिसत आहे.त्यामुळे घरातील महिलांनाच कामे करावी लागत आहे. या रोजंदारीने काम करणाऱ्या महिलांकडे खास प्रकारची एक शैली आहे. या महिला सकाळी एका उमेदवाराचा तर दुपारी दुसऱ्या आणि सायंकाळी तिसऱ्या म्हणजे एकाच दिवशी भाजप, काँग्रेस व शिवसेना अशाही उमेदवारांचा प्रचार करू शकतात. कारण त्याच्या जवळच्या पिशवीत तीन ते चार पक्षाचे झेंडे हमखास असतातच. घरकाम करणाऱ्या महिला सुटीवर गेल्याने आता घरची धुणीभांंडी घरच्याच महिलांना करावी लागत आहेत. या महिलांची मागणी इतक्या मोठ्या प्रमाणात आहे की अनेकांना प्रचारासाठी महिला मिळणे कठीण झाले आहे. दरम्यान या रोजंदारीने काम करणाऱ्या महिलांना दिवसाच्या रोजी साेबतच चहा, नास्ता आणि सायंकाळी वेळ पडली तर जेवणाची देखील व्यवस्था उमेदवारांकडून केली जाते. तेव्हा या घरकाम करणाऱ्या महिला घरी कमी आणि प्रचारात अधिक दिसून राहिल्या आहेत.दरम्याान घरकाम करणाऱ्या महिला प्रचारात गेल्याने घराघरात आरडा ओरड सुरू झाली आहे. प्रत्येक उमेदवाराची प्रभागातून निघालेली रॅली बघितली तर या सर्वांचा अंदाज यायला आता सुरुवात झाली आहे. या महिलांना रोड शो मध्ये सहभागी होण्यासाठी जाण्यायेण्याची खास व्यवस्था होती. त्यानंतर एका ठिकाणी चहा नास्ता व रोजीचे पैसे देखील वाटप करण्यात आले
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी