
‘महायुतीचा उद्देश फक्त सत्ता आणि पैसा’
अमरावती, 05 जानेवारी (हिं.स.) | माजी मंत्री तथा काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अमरावती दौऱ्यावर जोरदार टीका केली आहे. फडणवीसांच्या दौऱ्यासाठी गाड्यांनी भाड्याने लोक आणण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला. तसेच सामान्य नागरिकांना फडणवीस यांची प्रत्यक्ष भेट घेता आली नाही, असेही त्या म्हणाल्या.
यशोमती ठाकूर म्हणाल्या की, देवेंद्र फडणवीस यांनी अमरावतीकरांच्या अपेक्षाभंग केला असून महायुतीतील पक्षांमध्ये मोठ्या प्रमाणावर भांडणे सुरू आहेत. “महायुतीचा उद्देश लोकांची सेवा नसून केवळ सत्ता आणि पैसा मिळवणे हाच आहे,” असा घणाघाती आरोप त्यांनी केला.महायुतीतील अंतर्गत वाद इतके टोकाला गेले आहेत की एक दिवस हेच पक्ष एकमेकांविरुद्ध उभे ठाकतील, असा दावाही त्यांनी केला. येणाऱ्या महापालिका निवडणुकीनंतर जनता महायुतीला योग्य उत्तर देईल, असेही त्या म्हणाल्या.भाजपच्या नेत्यांकडून संत-महात्म्यांचा अपमान होत असल्याचा आरोप करत सत्ताधारी धर्माच्या नावावर राजकारण करतात; मात्र त्यांना धर्माची खरी मूल्ये समजत नसल्याचे ठाकूर यांनी सांगितले. अखेरीस सत्ताधाऱ्यांचे वाटोळ होणे ही वस्तुस्थिती असल्याचे त्यांनी नमूद केले.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी