

अमरावती, 05 जानेवारी (हिं.स.) । अमरावती महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक १९, साईनगर येथे युवा स्वाभिमान पक्षाच्या प्रचाराचा भव्य आणि उत्साहपूर्ण शुभारंभ रविवारी पार पडला. माजी खासदार नवनीत रवी राणा यांच्या हस्ते साईनगर येथील साई मंदिरात नारळ फोडून प्रचाराची अधिकृत सुरुवात करण्यात आली. यावेळी युवा स्वाभिमान पक्षाचे अधिकृत उमेदवार सचिन ओंकारराव भेंडे (चिन्ह – पाना), उदय गुलाब पर्वतकर (चिन्ह – पाना) तसेच पक्षाच्या समर्थित उमेदवार गौरी अमोल इंगळे (चिन्ह – शिट्टी) आणि सरिता सौरभ मालानी यांच्या प्रचाराचा श्रीगणेशा झाला. या कार्यक्रमाला प्रभागातील हजारो नागरिकांची उपस्थिती लाभली. “युवा स्वाभिमान पक्ष जिंदाबाद”, “पाना-पाना, विकासाचा बाणा” अशा घोषणांनी साई मंदिर परिसर दणाणून गेला. नवनीत राणा यांनी महाआरती करून साईबाबांच्या चरणी उमेदवारांच्या विजयासाठी प्रार्थना केली. उपस्थितांना संबोधित करताना त्यांनी सांगितले की, आमदार रवी राणा यांच्या नेतृत्वाखाली साईनगरमध्ये विकासाची ठोस दिशा मिळाली असून, ती पुढे नेण्यासाठी युवा स्वाभिमानचे उमेदवार कटिबद्ध आहेत. उमेदवार सचिन भेंडे, उदय पर्वतकर व गौरी इंगळे यांनी नागरिकांशी संवाद साधत रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता, महिला सक्षमीकरण आणि युवकांसाठी रोजगाराभिमुख उपक्रमांना प्राधान्य देण्याचा निर्धार व्यक्त केला. “जनतेचा विश्वास आणि आशीर्वाद हेच आमचे भांडवल आहे, असे त्यांनी नमूद केले. या कार्यक्रमामुळे प्रभाग १९ साईनगरमध्ये युवा स्वाभिमान पक्षाच्या प्रचाराला वेग आला असून, संपूर्ण प्रभागात “पाना-पाना… सर्वांगीण विकासाचा बाणा” हा नारा गाजू लागला आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी