
डोंबिवली, 05 जानेवारी (हिं.स.)। डोंबिवली शहरात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुखांची उमेदवारावर दबाव टाकणारी ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्याची चर्चा शहर होत आहे. या ऑडिओ क्लिपमध्ये संबंधित उमेदवार माझा बळी दिला जातोय का? विचारणा करीत असल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. यावर जिल्हाप्रमुखानी तो एक प्रक्रियाचा भाग असून सर्वच पक्षात असे होत असेत अशी भूमिका घेतली आहे. परिणामी कल्याण-डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत एका नव्या विषयाला उधाण आले आहे.
शहरात मतदान होण्या अगोदरच राजकीय वातावरण अधिक तापण्यास सुरुवात झाली आहे. महायुतीचे २० उमेदवार बिनविरोध निवडून आहे हा विषय चर्चित असताना आता शिवसेना (ठाकरे गट) मध्ये वादविवादात भर पडत आहे.
शिवसेना (ठाकरे गट) जिल्हाप्रमुख तात्या माने आणि प्रभाग क्रमांक २२ मधील उमेदवार वैशाली म्हात्रे यांच्यात झालेल्या बोलाचालीची एक ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. यात वारांवर माघारीसाठी दबाव टाकला जात असल्याचे समोर आले आहे.
जागावाटपात समन्वय नसल्याने शिवसेना (ठाकरे गट) व मनसे यामध्ये समस्या निर्माण झाली. त्यामुळे मोठी अडचण झाली आणि परिस्थिती तणावपूर्ण झाल्यामुळे दोन दिवसांपूर्वी डोंबिवलीतील शहर शाखेत शिवसैनिकांनी जिल्हाप्रमुख तात्या माने यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी केली होती. उद्धव ठाकरे यांच्या नावाचा वापर करून जिल्हाप्रमुख आम्हाला उमेदवारी अर्ज मागे घेण्यास सांगत आहेत असा आरोप उपस्थित कार्यकर्त्यांनी केला होता. त्यामुळे त्यांची हकालपट्टी करा अशी मागणीही केल्याच्या चर्चा आहेत. मात्र यानंतर आता प्रत्यक्ष या विषयाची माने व संबंधित उमेदवार यांच्या संभाषणाची क्लिप समोर आल्याने तात्या माने अडचणीत आल्याचे सांगत आहेत.
सदर ऑडिओ क्लिपमध्ये तात्या माने उमेदवार वैशाली म्हात्रे यांना पक्षाचा आदेश असल्याचे सांगून माघार घेण्यास सांगत आहेत. त्यावर वैशाली म्हात्रे यांनी विचारले, साहेब, एका घरात दोन तिकीटं देता आणि आता मला सांगताय माघार घ्या मी कशी काय माघार घेऊ? यावर तात्या माने यांनी वरून आदेश आले की आपल्याला ते पाळावे लागतात असे उत्तर दिले. यानंतर संतापलेल्या वैशाली म्हात्रे यांनी म्हणजे आता माझाच बळी दिला जातोय का? असा सवाल केला. हे सर्व संभाषण त्या क्लिपमधून समजत आहे.या विषयाबाबत तात्या माने यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगीतले की, वरिष्ठांच्या आदेशानुसार काम केलं जात असतं.
हिंदुस्थान समाचार / Prashant Joshi