2एनएम ए20 चिपमुळे आयफोन 18 महागण्याची शक्यता
मुंबई, 05 जानेवारी (हिं.स.)। अ‍ॅपलच्या 2026 मध्ये येणाऱ्या फ्लॅगशिप आयफोन मालिकेच्या किंमती वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. चिप उत्पादन खर्चात मोठी वाढ होत असल्यानं कंपनीच्या नफ्यावर दबाव निर्माण झाला असून याचा थेट परिणाम आयफोनच्या किमतींवर ह
iPhone


मुंबई, 05 जानेवारी (हिं.स.)। अ‍ॅपलच्या 2026 मध्ये येणाऱ्या फ्लॅगशिप आयफोन मालिकेच्या किंमती वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. चिप उत्पादन खर्चात मोठी वाढ होत असल्यानं कंपनीच्या नफ्यावर दबाव निर्माण झाला असून याचा थेट परिणाम आयफोनच्या किमतींवर होऊ शकतो. सप्टेंबर 2026 मध्ये लाँच होणाऱ्या आयफोन 18 मालिकेमध्ये अ‍ॅपल प्रथमच 2 नॅनोमीटर (2एनएम) तंत्रज्ञानावर आधारित नवीन ए20 किंवा ए20 प्रो प्रोसेसर वापरणार आहे. ही तांत्रिक झेप आयफोन अधिक वेगवान आणि ऊर्जा कार्यक्षम बनवणार असली, तरी उत्पादन खर्च लक्षणीय वाढणार आहे.

अ‍ॅपल 2026 मध्ये आपल्या मोबाईल चिपसेटसाठी 2nm उत्पादन प्रक्रिया स्वीकारणार असून, ही कंपनीसाठी मोठी प्रगती मानली जाते. सॅमसंगनं आधीच डिसेंबरमध्ये 2एनएम आधारित एक्सिनोस 2600 प्रोसेसर सादर केला आहे आणि अ‍ॅपलही त्याच दिशेनं वाटचाल करत आहे. A20 किंवा A20 प्रो चिप्स आयफोन 18 प्रो, आयफोन 18 प्रो मॅक्स आणि संभाव्य आयफोन फोल्ड यांसारख्या प्रीमियम मॉडेल्सना पॉवर देतील.

दरम्यान, अ‍ॅपलचा दीर्घकाळचा चिप उत्पादन भागीदार टीएसएमसी (TSMC) प्रगत सिलिकॉन वेफर्सच्या किंमती वाढवण्याच्या तयारीत आहे. तायवानमधील अहवालांनुसार, 2nm प्रक्रियेसाठी वापरल्या जाणाऱ्या 12 इंच वेफरमध्ये सुमारे 100 थर असतात आणि एका वेफरची किंमत अंदाजे 30,000 डॉलर, म्हणजेच सुमारे 27 लाख रुपये आहे. तुलनेत सध्याच्या 3nm प्रक्रियेसाठी वेफरची किंमत सुमारे 20,000 डॉलर इतकी आहे.

वेफरच्या किंमती वाढल्यानं अ‍ॅपलला प्रति चिप खर्चात मोठी वाढ सहन करावी लागणार आहे. A20 किंवा A20 प्रो प्रोसेसरची किंमत कंपनीला सुमारे 280 डॉलर, म्हणजेच जवळपास 25,200 रुपये पडू शकते. हा खर्च सध्याच्या A19 प्रोच्या अंदाजे 150 डॉलरच्या तुलनेत जवळपास 87 टक्क्यांनी जास्त आहे. याआधीच्या A18 प्रो चिपच्या तुलनेत तर ही किंमत अनेक पट अधिक आहे.

या पार्श्वभूमीवर अ‍ॅपलसमोर दोन पर्याय उरतात—एकतर वाढलेला खर्च स्वतः उचलून नफ्याचं मार्जिन कमी करणे किंवा 2026 मध्ये आयफोनच्या किंमती वाढवून त्याचा भार ग्राहकांवर टाकणे. दुसरीकडे, सॅमसंग आपल्या 2nm वेफर्ससाठी टीएसएमसीपेक्षा कमी दर आकारत आहे. अहवालांनुसार, सॅमसंग 12 इंचांच्या 2nm GAA वेफर्सची किंमत सुमारे 20,000 डॉलर ठेवत असून ती टीएसएमसीच्या दरांपेक्षा सुमारे 33 टक्के कमी आहे. मात्र, उत्पादन गुणवत्ता आणि विश्वासार्हतेमुळे अ‍ॅपल अजूनही आपल्या प्रगत चिप्ससाठी टीएसएमसीवरच अवलंबून राहण्याची शक्यता आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande