
मालेगाव, 06 जानेवारी (हिं.स.)महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज माघारीनंतर चित्र स्पष्ट होत असतानाच शहराच्या राजकारणात दोन मोठ्या घडामोडींनी खळबळ उडवून दिली आहे. एका बाजूला सेक्युलर फ्रंटमधून वंचित बहुजन आघाडीने अधिकृतपणे बाहेर पडण्याची घोषणा केली आहे. दुसऱ्या बाजूला राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाला ऐनवेळी उमेदवारांनी अर्ज माघारी घेतल्याने मोठा धक्का बसला आहे.
नामनिर्देशन अर्ज भरण्याच्या सुरुवातीला शहरातील इस्लाम पक्ष, समाजवादी पक्ष आणि वंचित बहुजन आघाडी यांनी एकत्र येत सेक्युलर फ्रंटच्या माध्यमातून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, प्रभाग क्रमांक २ येथील 'ब' जागेवरून वाद निर्माण झाला. ही जागा वंचित बहुजन आघाडीच्या वाट्याला
देण्यात आली असतानाही इस्लाम पक्षाने त्या जागेवर थेट आपला उमेदवार उभा केल्याचा आरोप वंचितच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे. विशेष म्हणजे, या जागेवर वंचित बहुजन आघाडीच्या अधिकृत उमेदवाराविरोधातच उमेदवार देण्यात आल्याने नाराजी वाढली. अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी अखेरच्या क्षणापर्यंत वाट पाहूनही इस्लाम पक्षाच्या उमेदवाराने अर्ज माघारी न घेतल्याने आपली फसवणूक झाल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीने केला. पत्रकार परिषदेत वंचित बहुजन आघाडीने सेक्युलर फ्रंटमधून बाहेर पडण्याचा निर्णय जाहीर केला. वंचित बहुजन आघाडीचे चार अधिकृत उमेदवार निवडणूक रिंगणात असून, एकूण पाच उमेदवारांना पुरस्कृत करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. या निर्णयामुळे मालेगाव महापालिका निवडणुकीतील राजकीय समीकरणे पुन्हा एकदा बदलण्याची शक्यता व्यक्त होत आहे. दरम्यान, उमेदवारी अर्ज माघारीच्या अंतिम दिवशीच राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षालाही मोठा धक्का बसला. पक्षाकडून अधिकृत उमेदवारी मिळालेल्या काही उमेदवारांनी अचानक अर्ज माघारी घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चे ला उधाण आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून अपक्ष उमेदवारांना पुरस्कृत करण्याच्या हालचाली सुरू असल्याचे समजते.
राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाने मागील आठवड्यात महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारांची यादी जाहीर केली होती. यामध्ये प्रभाग क्र. ९ 'ब' साठी भारती सौंदाणे यांचा समावेश होता. मात्र त्यांचा अर्ज छाननीत बाद झाल्याने त्यांनी अपक्ष म्हणून अर्ज कायम ठेवला. तसेच प्रभाग १० 'अ' मधून ज्योती पवार,
१० 'ब' मधून महेश लोंढे आणि १० 'ड' मधून रवींद्र पवार यांना अधिकृत उमेदवारी देण्यात आली होती. असे असतानाही ऐनवेळी या तिघांनी अर्ज माघारी घेतल्याने पक्षाची रणनीती कोलमडल्याचे चित्र आहे. या तिन्ही उमेदवारांची पार्श्वभूमी शिंदेसेना गटाशी संबंधित असून, 'एबी' फॉर्म न मिळाल्याने त्यांनी राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाची अधिकृत उमेदवारी स्वीकारली होती. शिंदेसेना गटातील नाराज व बंडखोरांना आपल्या गटात सामील करून घेण्याचा हा प्रयत्न होता. मात्र, अर्ज माघारी घेतल्याने हा डाव पूर्णपणे फसल्याचे बोलले जात आहे. सध्या राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाकडून प्रभाग क्रमांक १ 'अ' मधून सुषमा म्हसदे, प्रभाग क्रमांक ९ 'अ' मधून सुमित मोरे, प्रभाग क्रमांक ९ 'ब' मधून प्रियंका सोनवणे आणि प्रभाग क्रमांक १२ 'ब' मधून दीपक बच्छाव आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV