डोंबिवली -आम्ही नाराज असलो तरी आम्ही युतीचेच काम करणार - प्रल्हाद जाधव
डोंबिवली, 06 जानेवारी (हिं.स.)कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत होत असलेल्या निवडणुकीत जरी रिपाई आठवले गटातील इच्छुकाना सामावून घेण्यात आले नसले तरी आम्ही महायुतीच्याच उमेदवारांसाठी काम करणार. पूर्वी काँग्रेसने तसेच भाजपने आम्ही युतीत असूनही आम्हाला कध
Photo1


डोंबिवली, 06 जानेवारी (हिं.स.)कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत होत असलेल्या निवडणुकीत जरी रिपाई आठवले गटातील इच्छुकाना सामावून घेण्यात आले नसले तरी आम्ही महायुतीच्याच उमेदवारांसाठी काम करणार. पूर्वी काँग्रेसने तसेच भाजपने आम्ही युतीत असूनही आम्हाला कधीही सहकार्य केले नाही. तरीही प्रत्येकवेळी आम्ही आमच्या वचनावर ठाम राहून मदत केली. आमचे पक्षप्रमुख केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या शब्दाखातर आमच्या मनातील नाराजी बाजूला ठेवून आम्ही येणाऱ्या कडोंमपा निवडणुकीत महायुतीचाच प्रचार करून उमेदवारांना विजय करू असे वक्तव्य रिपाई कल्याण जिल्हाध्यक्ष प्रल्हाद जाधव यांनी डोंबिवलीत केले.

डोंबिवलीत रिपाई (आठवले गट) जनसंपर्क कार्यालयात जिल्हाप्रमुख प्रल्हाद जाधव यांनी पत्रकार परिषद आयोजित केली होती. यावेळी रिपाईचे पदाधिकारी किशोर मगरे, सिद्धार्थ रणपिसे, तुकाराम पवार, विठ्ठल खेडकर, धम्मपाल सरकटे, वसंत टेकाळे, दिलीप नागरे, सुरेश गायकवाड, प्रमिलाताई वावले यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दरम्यान पत्रकार परिषदेत प्रल्हाद जाधव यांनी सांगितले की, आमचे शहरप्रमुख किशोर मगरे यांनी भाजपा जिल्हा प्रमुख नंदू परब यांना रीतसर पत्र देऊन प्रभागातील आमच्या ताकदीची रीतसर माहिती दिली होती. त्याप्रमाणे आमच्या इच्छुक उमेदवारांना कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकीत योग्य वाटा द्यावा व त्यांना निवडणूक लढवण्यासाठी संधी द्यावी असे पत्र दिले होते. परंतु या विषयावर काहीही अधिकृत उत्तर न मिळाल्याने आमच्या शहरप्रमुखाने शिवसेना (शिंदे गट) जिल्हाप्रमुखांची संकल्पना त्यांनीही सांगितली. त्यांनीही आम्हाला अपेक्षित जागा मिळतील असे सांगितले होते परंतु अखेरच्या अखेरच्या टप्प्यात महायुतीतून रिपाई आठवले गटासाठी एकही जागा देण्यात आली नाही. परिणामी आमचे कार्यकर्ते पदाधिकारी अतिशय नाराज झाले. एवढ्या मोठ्या संख्येने शहरात असलेल्या आमच्या जनसमुदायाचा विचार झाला नसल्याची खंत त्यांना वाटली. त्यामुळे नाराजी येणे स्वाभिगच आहे. पदाधिकारी कार्यकर्ते नाराज असल्याने त्यांनी हा विषय केंद्रीय मंत्री आठवले यांच्या कानावर घातला. परंतु महायुतीत रिपाईने शब्द दिला असून तो शब्द पाळला पाहिजे. आपण कधीही दिलेल्या शब्दावर दगाफटका करत नाही अशी भूमिका मंत्री रामदास आठवले यांनी पदाधिकारी व कार्यकर्त्यांना लक्षात आणून दिली. त्यामुळे त्याचे पालन करण्याचे ठरवण्यात आले. त्याप्रमाणे जरी मनातून नाराज असलो तरी युती धर्म म्हणून आम्ही भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, रिपाई महायुतीच्या उमेदवाराला सह करण्याचं निश्चित केले आहे. परंतु युतीतील नेत्यांना आमची विनंती आहे की, पुढे येणाऱ्या महायुतीच्या सत्तेत आम्हाला सामावून घ्यावे अशी मागणी जिल्हाध्यक्ष प्रल्हाद जाधव यांनी केली आहे. महापालिकेत आम्हाला स्वीकृत सदस्य तसेच परिवहन, शिक्षण मंडळ आदी विभागात आमच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना संधी मिळायला पाहिजे अशी मागणी यावेळी त्यांनी केली.

------

हिंदुस्थान समाचार / Prashant Joshi


 rajesh pande