
लातूर, 06 जानेवारी (हिं.स.)एकीकडे 'स्मार्ट सिटी' आणि सुव्यवस्थेच्या गप्पा मारणारे प्रशासन प्रत्यक्षात किती झोपलेले असते. याचा जळजळीत अनुभव अहमदपूरकरांना येत आहे. वारंवार सूचना देऊनही अहमदपूर नगर परिषद आणि स्थानिक प्रशासनाने याकडे सोयीस्कर दुर्लक्ष केले आहे. परिणामी, आज पुन्हा एकदा शहराचा आठवडी बाजार लातूर-नांदेड या मृत्यूच्या सापळा बनलेल्या राष्ट्रीय महामार्गावरच भरला.
प्रशासकीय नाकर्तेपणाचा कळस अहमदपूर पालिकेचे नियोजन इतके 'रामभरोसे' झाले आहे की, भाजीपाला विक्रेते आणि व्यापाऱ्यांना बसण्यासाठी हक्काची जागाही पालिका उपलब्ध करून देऊ शकलेली नाही. वसुलीच्या नावाखाली प्रत्येक व्यापाऱ्याकडून ५ ते १० रुपये गोळा करण्यात पालिका आघाडीवर आहे, मात्र सुविधा आणि सुरक्षेच्या बाबतीत 'शून्य' प्रगती आहे. क्रीडा संकुलावर कार्यक्रम असले की बाजार थेट रस्त्यावर येतो, हे प्रशासनाचे कसले नियोजन? असा सवाल आता सामान्य नागरिक विचारत आहेत.
महामार्गावर 'टांगती तलवार'
लातूर-नांदेड हा रस्ता अतिशय वर्दळीचा राष्ट्रीय महामार्ग आहे. इथून अवजड वाहने आणि वेगाने येणारी कार-जीप सतत धावत असतात. अशातच रस्त्याच्या दोन्ही बाजूला, अगदी डांबरीकरणापर्यंत दुकाने थाटली जात असल्याने १० ते १५ हजार लोकांचा जीव टांगणीला लागलेला असतो.
भीषण वास्तव: जर एखादे भरधाव वाहन नियंत्रणाबाहेर गेले, तर होणाऱ्या भीषण नरसंहाराला जबाबदार कोण? वाहतुकीचा खोळंबा: तासनतास लागणाऱ्या जाममुळे रुग्णवाहिका अडकल्यास त्या रुग्णाच्या मृत्यूला प्रशासन जबाबदार धरणार का?
शहरात एवढा मोठा प्रश्न आ वासून उभा असताना स्थानिक लोकप्रतिनिधींनी घेतलेले मौन संशयास्पद आहे. केवळ निवडणुकांपुरते आश्वासने देणारे नेते आता जनतेचा जीव धोक्यात असताना कुठे गायब आहेत? प्रशासकीय अधिकारी 'आंधळे-बहिरे' झाल्याचे सोंग घेत असून, ते कदाचित एखाद्या मोठ्या अपघाताची आणि बळीची प्रतीक्षा करत असावेत, अशी जळजळीत टीका आता चौकाचौकात होत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis