
रायगड, 06 जानेवारी (हिं.स.)। मुंबई–गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६ वरील आंबेवाडी–कोलाड–वरसगांव येथील स्थानिक नागरिकांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी सुरू असलेले साखळी उपोषण दुसऱ्या दिवशीही सुरूच राहिले आहे. या आंदोलनाला भेट देत रायगड जिल्हा शिवसेना (शिंदे गट) प्रमुख प्रमोद घोसाळकर यांनी नागरिकांच्या मागण्यांना ठाम पाठिंबा जाहीर केला. जोपर्यंत आंबेवाडीतील स्थानिक नागरिकांच्या मागण्या शासनाकडून मान्य होत नाहीत, तोपर्यंत शिवसेना त्यांच्या पाठीशी ठामपणे उभी राहील, असे आश्वासन त्यांनी दिले.
यावेळी पत्रकारांशी बोलताना प्रमोद घोसाळकर म्हणाले की, “मुंबई–गोवा महामार्गावरील या पुलाला तब्बल १७ वर्षे पूर्ण झाली आहेत. मात्र या कालावधीत स्थानिक नागरिकांच्या मूलभूत प्रश्नांकडे दुर्लक्ष झाले आहे. अनेक मोठे नेते या परिसरातून पुढे गेले, पण कोलाडवासीयांचा विसर त्यांना पडला. जर स्थानिक नेत्यांनी वेळेत काम केले असते, तर आज ग्रामस्थांना आंदोलन करण्याची वेळ आली नसती.”
ते पुढे म्हणाले की, आंबेवाडी–वरसगांव नाका हे महत्त्वाचे बाजारपेठेचे व दळणवळणाचे केंद्र आहे. विविध भागातून दररोज मोठ्या प्रमाणात नागरिक ये-जा करतात. मात्र येथे अंडरपास किंवा बोगदा नसल्यामुळे नागरिकांना एक ते दोन किलोमीटर अंतर वळसा घालून प्रवास करावा लागत आहे. सर्व्हिस रोडचे काम अर्धवट अवस्थेत असल्याने वारंवार अपघात होत असून, गटारांवर झाकण नसल्यामुळे मनुष्यहानी व जनावरांची हानी होत असल्याचेही त्यांनी नमूद केले.
“नागरिकांच्या सर्व मागण्या रास्त असून, त्यांचा शासन दरबारी पाठपुरावा केला जाईल,” असे आश्वासन घोसाळकर यांनी दिले. आंबेवाडी बाजारपेठेतील द.ग. तटकरे चौकात सुरू असलेल्या साखळी उपोषणाला त्यांनी भेट दिली.
यावेळी आंबेवाडी ग्रामपंचायतीचे माजी सरपंच सुरेशशेठ महाबळे, चंद्रकांत लोखंडे, गणेश शिंदे, महेंद्र वाचकवडे, संजय कुर्ले, चंद्रकांत जाधव, विजय बोरकर, उदय खामकर, विष्णु महाबळे यांच्यासह मोठ्या संख्येने व्यापारी व कोलाड परिसरातील नागरिक उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके