अंबाजोगाईत नगराध्यक्ष नंदकिशोर मुंदडा यांनी स्वीकारला पदभार
बीड, 06 जानेवारी (हिं.स.)। साडेचार दशकांपासून राजकारणात सक्रिय असलेले नंदकिशोर मुंदडा यांनी सोमवारी, अंबाजोगाई नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला. पदग्रहणाच्या या ऐतिहासिक क्षणासाठी शहरात जनसागर उसळला. पदभार स्वीकारताच त्यांनी रमाई आवा
नगरपरिषद


बीड, 06 जानेवारी (हिं.स.)। साडेचार दशकांपासून राजकारणात सक्रिय असलेले नंदकिशोर मुंदडा यांनी सोमवारी, अंबाजोगाई नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला. पदग्रहणाच्या या ऐतिहासिक क्षणासाठी शहरात जनसागर उसळला. पदभार स्वीकारताच त्यांनी रमाई आवास योजनेच्या हप्त्याच्या धनादेशावर स्वाक्षरी करून कारभार सुरू केला. सामान्यांच्या हिताला प्राधान्य देण्याचा संदेश त्यांनी यानिमित्ताने दिला.

या सोहळ्यानिमित्त 'शहर परिवर्तन जनविकास आघाडी'तर्फे भव्य मिरवणूक काढण्यात आली. अक्षय निवासस्थानापासून सुरू झालेली मिरवणूक मोंढा, छत्रपती शिवाजी महाराज चौक, योगेश्वरी देवी मंदिर, बस स्थानक मार्गे नगरपालिकेत पोहोचली. उघड्या जीपमधून मिरवणुकीत सहभागी झालेल्या मुंदडा यांना ठिकठिकाणी क्रेनच्या साहाय्याने हार घालण्यात आले. जेसीबीमधून फुलांची उघळण झाली. महिलांनी औक्षण करून स्वागत केले. ढोल-ताशांच्या गजरात परिवर्तन आघाडी, भाजपचे नवनिर्वाचित व माजी नगरसेवक, पदाधिकारी आणि हजारो कार्यकर्ते सहभागी झाले.

नगरपालिकेच्या मीटिंगहॉलमध्ये मुख्याधिकारी प्रियांका टोंगे यांनी मुंदडा यांचे स्वागत करून पदभार सुपूर्द केला. जनतेसाठी आयुष्य झिजवणाऱ्या मुंदडा यांचा हा सन्मान अंबाजोगाईकरांच्या कृतज्ञतेचा उत्सव ठरला. यावेळी जनविकास परिवर्तन आघाडीच्या सर्व नवनिर्वाचित उमेदवारांचेही स्वागत करण्यात आले. या सोहळ्याने अंबाजोगाईच्या राजकारणात नव्या पर्वाची सुरुवात झाल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली. मुख्याधिकारी प्रियांका टोंगे म्हणाल्या, नगराध्यक्ष आणि प्रशासन एकत्रितपणे शहर विकासासाठी काम करतील. प्रशासनाकडून पूर्ण सहकार्य दिले जाईल.

युवा नेते अक्षय मुंदडा यांनी नगरपालिका राज्यात प्रथम क्रमांकावर यावी, कर वसुलीत पारदर्शकता असावी, मासिक बैठकीचे लाईव्ह प्रक्षेपण व्हावे, प्रभागनिहाय जनता दरबार भरवावा, अशा सूचना केल्या. भ्रष्ट कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, असेही त्यांनी सांगितले. मुंदडा यांनी भावनिक अंबाजोगाईकरांचे आभार मानले. ही पहिली आणि शेवटची संधी असल्याचे सांगत त्यांनी भाषणात कोणताही डाग लागू न देण्याची ग्वाही दिली. 'गिव्ह रिस्पेक्ट, टेक रिस्पेक्ट' या सूत्रावर काम करण्याचे आवाहन केले. स्वतःचे सर्व कर आधी भरूनच नागरिकांना कर भरण्याचे आवाहन करणार आहे. सर्वांची कामे करणार असल्याचे त्यांनी सांगीतले.

---------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande