
सोलापूर, 6 जानेवारी (हिं.स.)। लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेली पंढरपूरची चंद्रभागा नदी प्रदूषणाच्या विळख्यात सापडली आहे. नदी पात्रातील दूषित पाण्यामुळे जलचर प्राण्यांबरोबरच पशू-पक्ष्यांचा जीवही धोक्यात आला आहे. अलीकडेच नदी पात्रातील दूषित पाण्यामुळे मासे मृत्युमुखी पडल्याची घटना ताजी असतानाच, आता नदीतील पाणी प्यायल्यामुळे पक्षीही मृत पावल्याची घटना समोर आली आहे. अशातच नदी पात्रातील दूषित पाण्यामुळे भाविकांच्या आरोग्याचा प्रश्नही पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. माघी यात्रा तोंडावर असतानाच चंद्रभागेतील पाणी दूषित झाल्याने भाविकांमधून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. चंद्रभागा नदीतील पाणी स्वच्छ करण्यासाठी राज्य शासनाने सेबर टेक्नॉलॉजीचा वापर केला आहे. परंतु, ही यंत्रणा कुचकामी ठरली आहे. या योजनेवर राज्य शासनाकडून कोट्यवधी रुपयांचा खर्च करण्यात आला आहे. मात्र, तो खर्चही आता पाण्यात गेल्याचे समोर आले आहे.
राज्य सरकारने ‘नमामि चंद्रभागा’ प्रकल्पाची घोषणा केली आहे; मात्र ही योजना अजूनही कागदावरच आहे. येथील चंद्रभागेच्या पात्रामध्ये स्नानासाठी हजारो भाविक येतात; मात्र नदी प्रदूषित झाल्याने भाविकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. सध्या नदी पात्रामध्ये मोठ्या प्रमाणावर शेवाळाचा थर आल्याने पाण्याला दुर्गंधी सुटली आहे. दुर्गंधीयुक्त पाण्यामुळे सोमवारी नदी पात्रात एका बदकाचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड